हर्षवर्धन पाटील यांचे आमदार दत्तात्रय भरणे यांना आव्हान..? आगामी निवडणुकीत हर्षवर्धन पाटील व आ.दत्तात्रय भरणे यांच्यात मैदान होणार..? बावडा येथे पाटील यांच्या हस्ते पार पडले सात कोटी रुपयांची भूमिपूजन व उद्घाटन..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : कोणतेही पद नसतानाही येथील जनतेचे आपल्यावरील प्रेम कायम असल्याचे पदोपदी जाणवते.गावचे नागरिक कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांनी आपल्या गावचे नाव दिल्लीच्या संसद भवनात 2 वेळा पोहोचविले. प्रत्येकाच्या राजकीय जीवनात चढ उतार असतो. शंकररावजी पाटील, शहाजीराव पाटील यांनाही चढउताराचा सामना करावा लागला आहे. काही काळ आपणही अडचणीच्या काळात गेलो, मात्र आता राजकारणातील आपला अडचणीचा काळ संपला आहे. त्यामुळे कोण विश्रांती घेईल ते येणारा काळच ठरवेल, असा टोला भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी अनेक वेळा सभांमधून हर्षवर्धन पाटलांवर टीकास्त्र सोडले होते. मंत्रीपदाच्या 19 वर्षाच्या काळात काय केलं असा सवाल त्यांनी केला होता. आता जनतेने तुम्हाला विश्रांतीसाठी घरी बसवले आहे. तुम्ही आता विश्रांती घ्या, असा सल्ला अनेक वेळा आमदार भरणे यांनी दिला होता. त्यामुळे या सभेतील हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात पुन्हा भरणे- पाटील सामना होणार ? अशी चर्चा रंगू लागली आहे.
बावडा येथे रविवारी (दि.9) गावातील सुमारे 7 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची भूमिपूजने व उद्घाटने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते 6 प्रभागांमध्ये करण्यात आली. सदर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. या कार्यक्रमांना विशेष उपस्थिती म्हणून जेष्ठ नेते अशोक घोगरे उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बावडा गावातील सर्व प्रभागांमध्ये नागरी सुविधा, जन सुविधा, 3054, 2515 आदी योजनांतून रस्ते, सिमेंट रस्ते, बंदिस्त गटार, बाजारतळ काँक्रीटीकरण आदी एकूण 42 विविध कामांची भूमिपूजन व उद्घाटने करण्यात आली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, बावडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेनंतर आपल्याकडे सत्ता नसतानाही गावचा चौफेर विकास झाला आहे. इंदापूर तालुक्यातील पहिले बिनविरोध थेट सरपंच झालेल्या किरण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावामध्ये कोविड काळात अतिशय चांगले काम केले. गावामध्ये 23 जाती धर्माचे लोक राहतात, या सर्वांना बरोबर घेऊन विकास करण्यात आला आहे. बावडा ग्रामपंचायतीस प्रारंभी स्वर्गीय रत्नप्रभादेवी पाटील जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्याकडूनही विकास कामांसाठी भरीव निधी मिळाला.
ते पुढे म्हणाले, संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर गावामध्ये उड्डाणपूल प्रस्तावित होता, उड्डाणपूल असता तर गावचे गावपण संपले असते. त्यामुळे आपण गावासाठी बायपास होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आपल्या गावातील शेतकऱ्यांना जमिनीचे कोट्यावधी रुपये मिळू शकले, तसेच बायपासमुळे गावचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 1200 घरकुले अंकिता यांच्या पाठपुरावामुळे बावडा गावासाठी मंजूर करण्यात आली आहेत. सध्या भाजपची केंद्रात व राज्यात सत्ता असून, आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात बावडा गावाच्या विकासासाठी तसेच इंदापूर तालुक्याचे विकासासाठी निधीची कमतरता बसणार नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले
प्रास्ताविक सरपंच किरण पाटील यांनी केले. त्यात त्यांनी गेल्या पाच वर्षात गावच्या विकासासाठी केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जेष्ठ नेते अशोक घोगरे, जिल्हा परिषदेचा सदस्या अंकिता पाटील – ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.











