दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील एका व्यक्तीला लग्न जमवलेले पैसे मागतोय, या कारणावरून ४५३ रुपयांचा दंड ठोठावलात एका कुटुंबाला समाजातून वाळीत अर्थात बहिष्कृत टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. शिव – फुले -शाहु- आंबेडकर यांच्या कर्मभूमीत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही विविध धर्माचे व जातीचे जातपंचायत सुरू आहेत आणि यातूनच समाजातून जात पंचायत बोलावून एखाद्याला बहिष्कृत बहिष्कृत करणारे, दंड आकारणे, वाळीत टाकणे किंवा त्याला कठोर शिक्षा देणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
भारतीय संविधानाने अशा स्वरूपाच्या जातीप्रथांना बंदी घातली आहे. मात्र काही समाजात अशा प्रथा आजही पाळल्या जात आहेत. दौंड तालुक्यातील यवत येथील इंदिरानगर परिसरात हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील एका कुटुंबाला जात पंचायतीने ४५३ रुपयाचा दंड ठोठावला असून एका आख्या कुटुंबालाच समाजातून वाळीत टाकले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , इंदिरानगर परिसरातील शोभाबाई राजाराम शिंदे (वय ५५) या हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मोलमजुरी करणाऱ्या महिलेने त्यांच्या समाजातील दोघांना दोन मुलीचे लग्न जमविण्यासाठी ८० हजार रूपये परत मागितले, या कारणावरून २ जुलै रोजी जात पंचायत बोलावली.
या जातपंचायतीत या महिलेला दोषी ठरवत ४५३ रुपयाचा दंडाची शिक्षा सुनवत बेकायदेशीर रित्या संपुर्ण कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले. सदर बहिष्कृत महिलेने यवत पोलीस ठाण्यात धाव घेत सदर प्रकार यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना सांगितला. पोलीस निरीक्षक यांनी याप्रकरणी जात पंचायतीचे प्रमुख पंच मोहन भगवान चव्हाण (मु.पो.आरोळी वस्ती, जामखेड, ता. जामखेड जि. अहमदनगर) व नारायण अर्जुन सांवत ( रा. ब्राम्हणी, ता.राहुरी जि. अहमदनगर) भगवान शंकर चव्हाण, भाऊराव सिताराम शिंदे, रणजित मोहन चव्हाण ( सर्व रा. मु.पो. आरोळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड जि. अहमदनगर , तानाजी अर्जुन सांवत 7) नाथा अर्जुन सांवत 8) नामदेव अर्जुन सांवत (सर्व रा. ब्राम्हणी, ता. राहुरी जि. अहमदनगर), गंगाराम रावजी चव्हाण (रा.हांडी निमगाव ता.नेवासा जि.अहमदनगर) या नऊ पंचांवर सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.