सातारा : महान्यूज लाईव्ह
तब्बल एक वर्ष त्याला प्रशिक्षक नव्हता, पण म्हणून त्याला काहीच फरक पडला नाही. त्याचा बाप त्याचा प्रशिक्षक बनला. बापाने अगोदर यूट्यूबवर तिरंदाजी शिकली, मग मुलाला शिकवली आणि हा साताऱ्याचा मराठमोळा अर्जुन जगातला तिसरा डोळा फोडण्यासाठी समर्थ ठरला. आयर्लंड येथील निमरिक येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत सातारच्या पार्थ साळुंखे यांनी विजेतेपद पटकावले.
सातारच्या या युवा शिलेदाराने विश्वविजेती कामगिरी करताना दक्षिण कोरियन खेळाडूला सात तीन असे हरवले. युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 21 वर्षाखालील पुरुष रिकर्व वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावणारा महाराष्ट्राचा 19 वर्षीय पार्थ हा पहिला पुरुष तिरंदाज ठरला आहे.
youtube च्या मदतीने वडिलांनी या मुलाला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. रँकिंग राऊंडमध्ये पार्थने सातव्या मानांकित स्वांग इन जून याला पाच सेटच्या अतितटीच्या लढतीत सात तीन असे हरवले. 2012 मध्ये पार्थच्या प्रशिक्षकाने अचानक त्याची साथ सोडली. जवळपास वर्षभर त्याला प्रशिक्षक नव्हता.
अशा परिस्थितीत त्याच्या खेळावर परिणाम होऊ नये म्हणून त्याचे वडील त्याचे प्रशिक्षक बनले. त्यांनी युट्युब वर तिरंदाजी शिकली आणि त्यानंतर मुलाला शिकवले. 2018 च्या खेलो इंडिया स्पर्धेतील टॅलेंट स्काऊट टिमची पार्थ वर नजर पडली आणि त्यातून तो साई सेंटरमध्ये गेला. त्यानंतर मात्र ती त्याला उत्तम प्रशिक्षण मिळाले आणि पार्थने विजेतेपद पटकावण्यासाठी समर्थ ठरण्याच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. आजच्या स्पर्धेतून त्यांनी देशाचे नाव उज्वल केले.