सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात 2014 पूर्वी रस्त्यांची काय अवस्था होती, हे सर्वांना माहीत आहे; पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यापासून ते आत्तापर्यंत रात्रीचा दिवस करून रस्त्याची कामे मी मार्गी लावली आहेत. इंदापूर तालुक्यातील रस्त्यांचा विषयी जवळपास मिटला आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. शेकडो कोटींची कामे सुरू आहेत. माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निरगुडे येथे सांगितले.
इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे निरगुडे ते मदनवाडी पिंपळी या 3.78 कोटींच्या खर्चाच्या कामाचा रस्ता आता होणार आहे. त्याचे भूमिपूजन भरणे यांच्या हस्ते झाले .त्यावेळी भरणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, अमर भोसले, नवनाथ केकाण, संदीप लकडे, बबन रणधीर, निवृत्ती सोनवणे, अशोक लकडे, रोहित हेळकर, गणेश वाकडे, प्रशांत वाकडे, बबन गायकवाड, मारुती पानसरे, गणेश पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ते म्हणाले, गेल्या दहा-बारा वर्षात इंदापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. दळणवळणाच्या दृष्टीने अख्खा तालुका हा डांबरी रस्त्यांशी जोडला गेला आहे. सन 2014 पूर्वी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था कशी होती हे सर्वांना माहीत आहेच, आमदार झाल्यापासून तालुक्यामध्ये रस्त्यांचे जाळे विणले. प्रत्येक गावामध्ये डांबरीकरणाचे पक्के रस्ते झाले, त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे सुसह्य झाले आहेच.परंतु त्याचबरोबर छोट्या व्यवसायिकांना सुद्धा चांगले दिवस आले आहेत.
सध्या जिल्हा परिषदेच्या ताब्यातील काही गावातील रस्ते अजून करायचे बाकी आहेत, परंतू भविष्यात गाव-खेड्यातील वाड्या-वस्त्यासुध्दा पक्क्या रस्त्याने जोडणार आहे. लाकडी-निंबोडी योजना मंजूर करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, सोलापूर जिल्ह्यात अगदी अंत्ययात्रा काढत होते, जागोजागी माझे पुतळे जाळत होते, हेही सर्वांच्या लक्षात आहे. इंदापूर तालुक्यातील एकही गाव अथवा एकही वाडी वस्ती अशी नसेल, जिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसेल. माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा आपण उतरवल्या शिवाय राहणार नाही.