मुंबई – महान्यूज लाईव्ह
राज्यात मोसमी पावसाने अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून सहकार विभागाने पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. आता या निवडणूका सप्टेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. कालच सहकार विभागाने निवडणूका घेताना आता क्रियाशील व अक्रियाशील मतदारांबाबत राज्य शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयाप्रमाणेच मतदार याद्या बनवाव्यात असा आदेश दिला आहे. मात्र सप्टेंबरनंतरच याला मुहर्त लागेल असे दिसत आहे.
राज्याच्या सहकारी विभागाच्या प्राधिकरणाला हे आदेश दिले असून राज्यातील ८२ हजार ६३१ ससंस्थांच्या निवडणूका तोंडावर आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी ४९ हजारहून अधिक संस्थांच्या मतदार याद्याही प्रारुप स्थितीत प्रसिध्द झालेल्या आहेत. त्यापैकी ४२ हजार संस्था्ंची निवडणूक प्रक्रियाही पूर्ण झाली असून ६ हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र आता या निवडणूकीला ब्रेक लागल्याने या याद्या पुन्हा नव्याने बनवाव्या लागतील.
राज्यात ३० जूननंतर पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, अशा संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया पावसाळ्यात होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर निवडणूकीला बाधा येण्याची शक्यता गृहीत धरून सहकार विभागाने या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत.