दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बाळासाहेब यशवंत भालचिम यांनी नुकताच पदभार स्विकारला असून यापूर्वी उपअधिक्षक राहिलेल्या शीतल जान्हवे खराडे – पाटील यांची पुणे येथे बदली झाली आहे.
सोलापूर शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून भालचीम काम पाहत होते. त्यांना उपअधिक्षक म्हणून बढती मिळाली असून त्यांची वाईला बदली झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव हे त्यांचे मूळगाव होय. एमपीएससी मार्फत १९९३ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून नागपूर शहरात त्यांनी नोकरीची सुरुवात झाली. त्यानंतर नांदेड ला बदली झाली.
तेथेच सहायक पोलीस निरीक्षक म्हणून बढतीने सोलापूरला बदली झाली. मुंबई व सोलापूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्रात बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून केंद्र सरकारचा चौथा क्रमांक पटकविला. सोलापूर पोलीस ठाण्यास पदक व प्रशस्तीपत्र मिळाले. गेली तीस वर्षे पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
वाई विभागातील वाई, भुईंज, पांचगणी, महाबळेश्वर व मेढा या पाच पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत.
सोशल मिडियावर जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज कोणीही पाठवू नयेत. अफवा अगर काही शंका असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे उपअधीक्षक भालचिम यांनी आवाहन केले आहे.