डॉ. रोहन खवटे यांनी केली ही यशस्वी शस्त्रक्रिया!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : आजवर आपण अनेकदा अवयव प्रत्यारोपणाची तसेच हाड, सांधे बदलल्याचे ऐकले असेल.. अगदीच दात पुन्हा नव्याने बसवताना चांदीचा किंवा सोन्याचा बसविला असेही ऐकलं असेल.. पण दौंड मध्ये जगावेगळी कहाणी घडली आहे; कारण दौंड मध्ये एका महिला रुग्णाला चक्क सोन्याचा गुडघा बसवण्यात आलाय.
दौंड शहरातील एका ४८ वर्षीय महिला रुग्णाला शस्त्रक्रिया करून सोन्याचा गुडघा बसवण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया केली आहे दौंड शहरातील खवटे एक्सीडेंट रुग्णालयाचे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तज्ञ डॉ. रोहन खवटे यांनी. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशी शस्त्रक्रिया ही पहिलीच आहे.
आतापर्यंत तुम्ही सोन्याचा दात बसवला, चांदीचा दात बसवला असे ऐकलं असेल किंवा बसवला ही असेल पण सोन्याचा गुडघा बसवला जातो, त्यावर मात्र ग्रामीण भागात शक्यतो विश्वास ठेवला जात नाही. मात्र ते खरं आहे. दौंड शहरातील एका ४८ वर्षीय महिला रुग्णाला मागील दोन वर्षापासून उजव्या गुडघ्याच्या विकाराने प्रचंड त्रास होत असल्याचं जाणवले.
त्यांना उठणे, बसणे, आंघोळ करणे, घरातली कामे करणे या गोष्टी करता येत नव्हत्या. इतकेच नव्हे तर झोपले, तरी गुडघे वाकवणे, सरळ करणे अशक्य होत होतं. तसे केल्यास अत्यंत वेदना त्यांना जाणवत होत्या. वयाच्या पंधरा वर्षापासून त्यांना त्या गोष्टीचा त्रास जाणवत होता. या आजारामुळे त्यांचा आवाज बंद व्हायचा आणि श्वास घेणेही अवघड व्हायचे.
त्यांच्या नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी दौंड शहरातील खवटे एक्सीडेंट रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले. डॉ. रोहन खवटे यांनी त्यांची तपासणी केली. गुडघ्याच्या आजारामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय उपयोजना म्हणजे गोळ्या, इंजेक्शन स्वरूपात करणे खूपच अवघड होते. प्रचंड झिजलेल्या गुडघ्यांसाठी फक्त गुडघा प्रत्यारोपण करणे हा एकमेव उपाय शिल्लक होता.
डॉक्टर रोहन खवटे यांनी सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची चर्चा करून त्यांच्यावर गुडघा प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया फार विशिष्ट प्रकारची म्हणजे सोन्याचा कृत्रिम गुडघा टाकून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोन्याचा कृत्रिम गुडघा हा साधा आणि सहज उपलब्ध नसतो त्याची किंमतही खूप जास्त असते, त्याला बसवण्याकरता अवघड उपचार पद्धती करावे लागतात.
ती बसवण्यासाठी एक वेगळंच कौशल्य लागते. मात्र दौंडमध्ये पहिल्यांदाच अशी विशिष्ट पद्धतीने तंत्रज्ञान वापरून अत्यंत अवघड असे प्रत्यारोपण अशीच गुडघ्याची शस्त्रक्रिया खवटे एक्सीडेंट रुग्णालयांमध्ये सोमवारी (दि. १९) यशस्वीरित्या करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी त्या रुग्णास घरी सोडण्यात आले.
ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने या रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. अतिशय चांगल्या पद्धतीने व रुग्णाला त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून सुरक्षित व काळजीपूर्वक शस्त्रक्रिया झाली असून रुग्ण त्रासातून मुक्त झाल्याची समाधानकारक प्रतिक्रिया रुग्णाच्या मुलाने दिली. ग्रामीण भागात अशी शस्त्रक्रिया ही पहिलीच आहे. अत्यंत अवघड अशी ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल सर्व स्तरातून डॉ. रोहन खवटे, डॉ. किरण खवटे, डॉ. संपदा खवटे यांचे कौतुक होत आहे.