विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही रस नाही.मला संघटनेत कोणतही पद द्या.मी त्या पदाला न्याय देईल.असे वक्तव्य नुकतेच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात केले होते. त्यांनी संघटनेतील कोणतेही पद देण्याची मागणी पक्षाकडे केली होती. यावर बोलताना शरद पवार यांनी हा निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यावर निर्णय होईल असे शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींवर अन्याय होत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. ते ओबीसी नेते आहेत. मधुकर पिचड कोण होते? सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली.
एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी आणि शरद पवार यांनी केली तर मुत्सद्देगिरी असं कसं चालेल. असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेवर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी बेईमानी कधी केली? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. असं आव्हान दिले. दरम्यान मी स्थापन केलेलं सरकार हे सर्वसमावेशक होतं. त्यात जनसंघ म्हणजे आताचा भाजपही होता. कदाचित हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल.त्यांचं वाचन कमी असेल. फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील अशी टीका शरद पवार यांनी केली.
तेलगंणाचे मुख्यमंत्री केसीआर आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यामुळे राज्यातील प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी आगामी काळात ते आव्हान निर्माण करतील का हे निवडणूकीतच दिसेल. केसीआरने महाराष्ट्रातील कांद्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु संपूर्ण राज्याचा विचार केला तर कांदा हे पीक फक्त पश्चिम महाराष्ट्रात होतो. नाशिक, धुळे व तीन चार जिल्ह्यात जिरायत शेतकरी कांदा पीक घेतात. दरम्यान काही वृत्तपत्रात अशा बातम्या आल्या होत्या की, येथील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हैदराबादला नेला.परंतु तेथे त्यांची फजिती झाली. त्यामुळे हे थोडे राजकीय दृष्ट्या वेगळे चित्र दाखवू शकतात. एवढाच त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांना सेवा करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे. असेही शरद पवार म्हणाले.