पुणे : महान्यूज लाईव्ह
पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी पिंपरी चिंचवड मध्ये एका कार्यक्रमाच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 1947 च्या स्वातंत्र्याला आपण स्वातंत्र्य म्हणतच नाही. हे कसले स्वातंत्र्य हे तर हांडगे स्वातंत्र्य अशा स्वरूपाचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी करत महात्मा गांधी आणि एकूणच स्वातंत्र्याच्या चळवळीवर टीका केली आहे.
पिंपरी चिंचवड मधील कार्यक्रमात भाजप आमदार महेश लांडगे देखील उपस्थित होते यावेळी भिडे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो असे म्हणणारे महात्मा गांधी आणि त्यांची वक्तव्य म्हणजे एक लफंगेगिरी होती. स्वातंत्र्याची चळवळ सुरु असतानाच महात्मा गांधी पहिल्या दिवसापासूनच ब्रिटिशांची पाठराखण करण्याचे काम करत होते.
आपण जोपर्यंत 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करू, तोपर्यंत या दिवशी उपवास ठेवा. खरंतर हा दिवस म्हणजे या दिवशी देशाचे तुकडे झाले आहेत, त्यामुळे हा दिवस त्यासाठी शोक पाळण्याचा दिवस आहे. जोपर्यंत लाल किल्ल्यावर भगवा फडकत नाही, तोपर्यंत आपला देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र झाला आहे असे म्हणता येणार नाही.
1947 मध्ये मिळालेला जे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपण म्हणतो, ते हांडगं असून 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन मानू, पण फक्त दखल म्हणून; अन्यथा त्याची काहीच गरज नाही. या पुढील काळात भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वतंत्रदिन आता साजरा करायचा आहे. या दिवशी भगवा झेंडा फडकवा. त्याची मिरवणूक काढा आणि तिरंग्याचा आकार कमी करा असे देखील भिडे म्हणाले.
जनगणमन हे आपले राष्ट्रगीत नाही. ते पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी टागोरांनी लिहिलेलं होतं. उगीचच त्याला आपलं राष्ट्रगीत कोणी संबोधलं माहित नाही. काय लायकीचे लोक आहेत आणि काय लायकीचे स्वातंत्र्यदिन आणि काय लायकीचं झेंडावंदन अशी वक्तव्ये त्यांनी केली.