बारामती – महान्यूज लाईव्ह
शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत बारामतीत संध्याकाळी सात वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होणार असून रविवारी याच जयंतीच्या निमित्ताने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैया बारामतीत येत आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विऱोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बावनकुळे हे अकलूज येथे सकाळी गोल रिंगणाला उपस्थित राहणार आहेत. तेथील रिंगण आटोपून ते बारामती तालुक्यात येत असून ते सोनगाव येथील सोनेश्वर मंदिराला भेट देतील. तेथेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळाबद्दल टिफीन बैठक घेणार आहेत.
माळेगाव बुद्रूक येथे लाभार्थी मेळावा कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी सात वाजता बारामतीत आयोजित केलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. शारदा प्रांगण येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, माजी सहकारमत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रविवारी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैय्या उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार आहेत.