दौंड : महान्यूज लाईव्ह
पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर बिरोबावाडी जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर दुपारी संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कार पेटवून दिली. या आगीत कार जळून खाक झाली.
नेहल अप्पासाहेब गावडे (वय २६, रा.पाटस – बिरोबावाडी ता.दौंड जि. पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पाटस ते दौंड रस्त्यावर पाटस हद्दीत असलेल्या बिरोबावाडी जवळ शनिवारी (दि.२४) सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या आसपास ही अपघाताची घटना घडली.
याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, नेहल गावडे हा बिरोबावाडी येथील ग्रामदैवत श्री. बिरोबा देवाचे दर्शन घेऊन पाटस दौंड रस्त्यावरून दुचाकीवर पाटस बाजूकडे घरी जात होता. यावेळी पाटस ते दौंड अष्टविनायक रस्त्यावरुन पाटस बाजूकडून दौंडकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक नेहल गावडे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रथमदर्शनी व्यक्तींनी दिली.
या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला. कार व दुचाकीची मोडतोड झाल्याने नुकसान झाले. दरम्यान काही संतप्त ग्रामस्थांनी दुपारी ही कार पेटवून दिली. यामुळे पाटस- दौंड रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. या आगीत ही कार जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पाटस ते दौंड रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम झाल्याने हा रस्ता गुळगुळीत झाला आहे. हा रस्ता अष्टविनायक मार्ग म्हणून ओळखला जातो परिणामी या मार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत असतात. काही दिवसांपूर्वी बिरोबावाडी हद्दीतच व्यायामासाठी गेलेल्या युवकाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा या मार्गावर दुचाकी चालक युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सध्या हा रस्ता अतिशय जीवघेणा बनला आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनांचा अतिवेग हा जीवघेणा ठरत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. यामार्गावर अपघाताला आळा बसावा यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.