फलटण : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे २५ जून रोजी महादेव कोळी समाजाचा राज्यव्यापी वधूवर परिचय मेळावा आयोजन केले आहे. या मेळाव्यास मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता, फिल्मनिर्माता व दिग्दर्शक स्वर्गिय दादासाहेब कोंडके यांचे नातू जितेंद्र कोंडके हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजकांनी दिली.
राज्यातील कानाकोपऱ्यात आदिवासी महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे, मात्र तो विखुरला गेला आहे. या समाजाला एकत्र आणण्यासाठी व तसेच मोफत वधूवर व भेट परिचय राज्यव्यापी मेळाव्याचे येत्या रविवारी २५ जुन रोजी फलटण शहरात आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी महादेव कोळी समाजातील सर्वांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता, फिल्मनिर्माता व दिग्दर्शक स्वर्गिय दादासाहेब कोंडके यांचे नातू जितेंद्र कोंडके यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात हा मेळावा फलटणला घेण्याची सुचना मांडली होती. त्यानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यासाठी उपवर व उपवधू व त्यांचे कुटूंबिय या सर्वांनी उपस्थित राहावे, तसेच सोबत वयाच्या पुराव्यासाठी उपवर व उपवधू यांचा शाळेचा दाखला, आधारकार्ड तसेच पासपोर्ट आकाराच्या दोन फोटोकॉपी सोबत येताना आणाव्यात. असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, कोल्हापूर बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर, कोरेगाव तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.