श्री नितीन पवार, सांगली
मंडळी चमकलात ना..सातच्या आत घरात या सिनेमात आदरणीय निळू फुले यांचा एक फेमस डायलॉग आहे.. पाटलाच्या पोरांनी दारू प्यावी, मास्तरला मारावं, पोरीची छेड काढावी, हवालदाराच्या कानफटात ठेवून द्यावी…!

हेच इम्प्रेशन पाटलांच्या पोराच्या बाबतीत सर्व महाराष्ट्रात आहे, पण या सगळ्याला फाटा देऊन अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी तरुण पोरं आपल्या महाराष्ट्रात आहेत, ज्यांना आपण समाजापुढे चांगली माणसे म्हणून पुढे आणले पाहिजे…

आमचा श्री सुनील भगवान पाटील सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान गावचा एक तरुण. ज्याचे शिक्षण B. A पर्यंत झालेले आहे. कवठेपिरान म्हटलं की आदरणीय हिंदकेसरी मारुती भाऊ माने यांचं गाव वारणा नदीकाठचं हे सधन गाव अनेकांच्या नजरेसमोर येतं.
या गावात दोन एकर शेती असणे म्हणजे सधन कुटुंबात गणले जाते. पण सुनीलची तर घरात पाच एकर शेती आहे, घरामध्ये दहा गाईंचा गोठा आहे,
तीन बहिणी आणि एकुलता एक मुलगा म्हणजे तो लाडातच वाढलेला असणार… हे वेगळं सांगायची गरज नाही आणि बागायती शेतकरी म्हटलं की त्याला अनुसरून जेवढ्या उपाध्या जोडून येतात, त्या येत असणार हेही तेवढेच खरं.
आठ महिन्यापूर्वी सुनील ची आणि माझी ओळख झाली, जेव्हा त्यांनी सांगलीवाडी येथे स्वतःचे नाश्ता सेंटर चालू केले. गप्पांच्या ओघात कळलं की हा एक सधन कुटुंबातील मुलगा आहे ..
आम्हालाही असं वाटायचं काय या पोराला दुर्बुद्धी सुचली आणि इथे येऊन वडे, भजी तळत आणि भांडी घासत बसलाय.. पण खरंतर सगळ्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच जाऊ विकनेस पॉईंट येतो तो सुनीलच्याही आयुष्यात आला. नाश्ता सेंटरला चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही, पण तो काय खचला नाही. असं सगळ्यांच्याच आयुष्यात येतं हे त्यालाही माहीत असणार, म्हणून त्यांनी त्याच जागेमध्ये छोटंसं बिर्याणी सेंटर सुरू केले.
आज पाटलांचा सुनील स्वतः सगळी कामे करतोय. अगदी बिर्याणीची तयारी, चिकन आणणे, कांदा कापणे, मसाला तयार करणे, चूल पेटवणे, पार्सल देणे, लोकांना जेवायला वाढण्यापासून ते अगदी भांडी घासण्यापर्यंतची कामे स्वतः सुनील करतोय. कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता…!
खूप लोकांना एखाद्या तरुणाने किंवा तरुणीने गरिबीतून खूप चांगले दिवस आणले हे जेवढे कौतुकास्पद वाटते तेवढेच मलाही वाटते. जी पोरं सधन कुटुंबातील आहेत आणि ती समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरत आहेत, त्यांनी रुळलेली वाट सोडून नवख्या वाटेने प्रवास करावा याचं ही कौतुक जास्त आहे म्हणूनच अशा मुलांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. मराठा व्यवसाय संघाचा महामेळावा 27 मे 2023 रोजी आहे. त्यामध्ये आम्ही सुनीलला सन्मानित करण्याचे ठरवले आहे. संपर्क: श्री सुनील पाटील 7507667690, श्री नितीन पवार, सांगली – 9822833728 / 7028733467