बारामती : महान्यूज लाईव्ह
एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया या बारामतीतील संस्थेच्या माध्यमातून व सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून आज बारामतीत विद्यानगरी चौक ते गदिमा सभागृहापर्यंतच्या रस्त्यावर हॅपी स्ट्रीट हजारो बारामतीकरांनी अनुभवला. यावेळी हॅपी स्ट्रीटमध्ये उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या अजितदादांनी जेव्हा धनुष्यबाण हातात घेतला, तेव्हा त्याची बातमी राज्यभर चर्चेत आली.
हॅपी स्ट्रीटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजितदादा विद्यानगरी चौकात आले आणि उद्घाटन करताना प्रत्येक स्टॉलवर ते गेले. एका ठिकाणी आर्चरीचा स्टॉल होता. त्या ठिकाणी माहिती घेत असतानाच आर्चरीचे प्रशिक्षण देणाऱ्या मार्गदर्शकाने थेट धनुष्यबाण अजितदादांच्या हातात सोपवला आणि अजितदादांनी देखील वेळ न दवडता थेट नेम धरला.
अजितदादांनी धनुष्यबाण हातात घेतल्याचा व्हिडिओ आणि फोटो काही वेळातच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात पोहोचले आणि दादांनी कोणावर नेम धरला अशा प्रकारची चर्चा नेटकऱ्यांनी सुरू केली.
अजितदादांनी अंगभर टॅटू काढणाऱ्यांना दिले खास उत्तर…
अंगभर टॅटू काढणाऱ्यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत सल्ला दिला. एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने आज बारामतीतील विद्यानगरी चौक ते गदिमा सभागृह या रस्त्यावर हॅपी स्टेट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आज पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच बारामतीकरांनी गर्दी केली होती. हजारो बारामतीकर या कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान यामध्ये टॅटू देखील होता. या टॅटूचा उल्लेख करत अजित पवार यांनी निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले, टॅटू काढणे गैर नाही. परंतु काही लोक अंगभर टॅटू काढतात. आपल्याला जे शरीर दिलेले आहे, आपल्या आई बापाने आपल्याला जन्म दिलेला आहे, एवढे चांगले शरीर दिलेले आहे. त्याचं एवढं वाटोळं कशाला करायचं? उगीचच काहीतरी काढत बसू नका. छोटा टॅटू काढायचा असेल ते ठीक आहे. मैत्रिणीचे नाव किंवा आईचे नाव काढले, तर त्यात काही वावगे नाही. एका ठिकाणी मी एका मुलीच्या हातावर तिच्या आईचे नाव तिने काढलेले होते, ते ठीक आहे. परंतु अतिप्रमाणात करू नका.