जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
ती एमपीएससी स्पर्धेत राज्यात तिसरी आली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी पदाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या 26 वर्षीय तरुणीचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दर्शना दत्तू पवार (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. ती नुकतीच स्पर्धा परिक्षेतून वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात तिचा सत्कार समारंभ होता. ९ जूनला ती पुण्यात आली होती. ती तिच्या नऱ्हे येथील एका मैत्रिणीकडे राहत होती. १२ जून रोजी मैत्रिणीला सिंहगड किल्ल्यावर ट्रेकींगसाठी जात असल्याचे तिने सांगितले होते. तसेच, कुटूंबाला देखील तिने याबाबत कल्पना दिली होती. तिच्या एका मित्रासोबत ती गेली होती.
१२ जून रोजी दर्शना गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला. फोन बंद झाल्याने तीन दिवस तिच्या कुटूंबाने शोध घेतला. पण, ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटूंबाने सिंहगड रोड पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सिंहगड पोलिसांनी लागलीच तरुणीचा व त्या तरुणाचा शोध सुरू केला.
त्याचदरम्यान दर्शनासोबत गेलेला तरूण देखील बेपत्ता असल्याबाबत समोर आले. त्याच्या कुटूंबाने याबाबत वारजे माळवाडी पोलिसांत मिसींग दाखल केली. त्यानंतर या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला. १२ जूनच्या दुपारनंतर या दोघांचे मोबाईल बंद झाले होते. शेवटचे लोकेशन वेल्हा येथील आल्याने त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू होता.
दरम्यान, आज राजगड किल्ऱ्याच्या पायथ्याला झाडांमध्ये एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वेल्हा पोलिसांनी लागलीच धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान तरुणीचा मोबाईल ,इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. कुटूंबाने धाव घेऊन तिची ओळख पटवली. यादरम्यान, प्राण्यांनी मृतदेहाशी छेडछाड केलेली असल्याचेही समोर आले.
तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र देखील बेपत्ता असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नेमकं घडले काय, याबाबत पोलीस आता युद्धपातळीवर तपास करत आहेत. सिंहगड रोड, वारजे आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा एकत्रित तपास केला जात आहे.