नागपूर – महान्यूज लाईव्ह
नागपूर येथील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने साऱ्याच पालकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. शनिवारी येथील टेकानाका परिसरातील ही घटना तौफीक फिरोज खान हा ४ वर्षे वयाचा मुलगा, सहा वर्षांची त्याची बहिण आलिया फिरोज खान व आफरीन इर्शाद खान ही सहा वर्षे वयाची मुलगी हे तिघेजण फारुकनगर ग्राऊंडवर खेळायला गेली.
शनिवारचा अख्खा दिवस गेला. संध्याकाळ उशीर झाली, तरी मुले आली नाहीत आणि पालकांची चिंता वाढली. पालकांनी शोधाशोध सुरू केली. मग पोलिसांतही तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून परिसरातील सीसीटिव्ही तपासायला सुरवात केली. परिसरातील लोकांनाही ही मुले दिसली, तर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
पण २४ तासांनंतरही मुले काही सापडेनात. ही मुले लहान असल्याने फार दूर गेली नसतील याची खात्री पोलिसांनाही होती. पण रविवारी रात्री आठ वाजता सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. घराबाहेर खेळण्यासाठी गेलेली दोन भावंडे व त्यांची एक लहान मैत्रिण तिघेही एका गाडीच्या डिकीत खेळण्यासाठी गेले होते.
डिकी लावून घेताच सध्याचा उन्हाळा व डिकीतून ऑक्सिजन मिळत नसल्याने ती मुले गुदमरून गेली होती. ही मुले सापडताच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, मात्र त्यांचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डिकीमध्ये गेल्यानंतर डिकी उघडता न आल्याने ही मुले गुदमरून मृत पावली.