मुंबई – महान्यूज लाईव्ह
वाहतूक पोलिसांच्या ग्रामीण व शहरी भागातील एका कृतीवरून मुंबईतील सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश देत एक टिप्पणी केली आहे, जी वाहनचालकांसाठी दिलासाच आहे.
वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकाची विशेषतः दुचाकीची चावी पोलिस काढून घेतात, मग तो दुचाकीस्वार त्याची दुचाकी ढकलत ढकलत ती दुचाकी रस्त्याच्या कडेला लावतो आणि पोलिसांकडे मिनतवारी करतो हे चित्र आपण सारेच आजूबाजूला पाहत असतो.
मुंबईत कुलाबा परिसरात घडलेल्या घटनेत सागर पाठक या विनाहेल्मेटधारी दुचाकीचालकाने २५ मे २०१७ रोजी वाहतूक नियम मोडला व वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिस दिसताच त्याने हेल्मेट घातले व कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण केली असा त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
त्याची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू होती. सहा वर्षानंतर त्याला न्याय मिळाला. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या व वाहतूकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणात न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. मात्र या आदेशादरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसांना चांगलाच झटका दिला.
दंडवसुली करण्याच्या पध्दतीतील त्रुटींवर न्यायालयाने बोट ठेवत वाहतूकीचे नियम मोडले, म्हणून दुचाकीची चावी घेण्याचा पोलिसांना अधिकार नसल्याचे तसेच दुचाकीचालकाने त्याचा परवाना दाखवल्यास दंडवसुलीसाठी त्याला पोलिस ठाण्यातच आले पाहिजे ही सक्तीही पोलिस करू शकत नाहीत असे या आदेशात स्पष्ट केले आहे,