मुंबई : महान्यूज लाईव्ह
शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारविरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतने आता या वादात कॉंग्रेसला ओढण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसवर निशाणा साधताना तिने सलग तीन ट्वीट करत शिवसेनेलाही डिवचले आहे. तर सोनिया गांधी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन करतानाच माझ्याबद्दल एवढे घडूनही तुम्ही गप्प का असा सवाल केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीचा एक जुना व्हिडिओ कंगनाने ट्विटमध्ये शेअर केला आहे. ‘माझ्या आवडत्या आदर्शांपैकी एक म्हणजे महान बाळासाहेब ठाकरे.. आज त्यांची शिवसेना कॉँग्रेससोबत आहे हे पाहून त्यांना काय वाटले असेल असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे.
कंगणाने दुसर्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘आदरणीय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्र सरकारने मला दिलेल्या या वागणुकीवर तुम्ही काही बोलणार नाही का..? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतील तत्त्वांचे पालन करण्यास तुम्ही तुमच्या सरकारला विचारणार नाही का?’ ट्विटमध्ये पुढे असे लिहिले आहे की, ‘आपल्याला महिलांच्या संघर्षांबद्दल माहिती असेल. जेव्हा आपल्या अखत्यारीतील सरकार महिलांवर अन्याय करीत आहे आणि कायदा व सुव्यवस्थेची चेष्टा करीत आहे. मला आशा आहे की आपण या प्रकरणात हस्तक्षेप कराल.
कंगणाने काही दिवसांपूर्वी मुंबईला पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणून संबोधले होते. त्यानंतर तिच्यावर सर्वच बाजूंनी टीका झाली. त्यानंतर मुंबई महापालिकेने कंगणाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम काढण्याची कारवाई सुरू केली. त्यावरून या वादात आणखी ठिणगी पडली. त्यामुळे कंगणाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर या कारवाईला स्थगिती मिळाली आहे.











