बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या रिद्धी वजरींगीकर हिने नीट ( वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्यासाठीची स्पर्धापरीक्षा ) परीक्षेत राज्यात विद्यार्थिनींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून बारामतीचा झेंडा देशात फडकवला आहे. तिला या परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळाले असून देशपातळीवर तिचा ४४ क्रमांक आलेला आहे. देशपातळीवर विद्यार्थिनींमध्ये ती ८ व्या क्रमांकावर राहिलेली आहे.
जे प्रभंजन या तामिळनाळूमधील आणि बोरा वरुण या आंध्रप्रदेशातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत शंभर टक्के म्हणजे ७२० पैकी ७२० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रातून पहिला आलेल्या श्रीनिखीत रवी याला या परिक्षेत ७१५ गुण मिळाले आहेत. या वर्षी एकुण ८ लाख ८१ हजार ९६७ विद्यार्थी तर ११ लाख ५६ हजार ६१८ विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली. यात ४ लाख ९० हजार ३७४ विद्यार्थी तर ६ लाख ५५ हजार ५९९ विद्यार्थिनींनी या परीक्षेत यश मिळविले आहे. या वर्षीचा कट ऑफ हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी १३७ तर एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी १०७ गुणांचा राहिला आहे.
बारामतीमध्ये शिक्षणाच्या सोयी सतत वाढत आहेत. दर्जैदार शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था या शहरात कार्यरत आहेत. त्यामुळे सातत्याने येथील विद्यार्थी स्पर्धापरीक्षांमध्ये झळकत आहेत. आज बारामतीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले तीस हजाराहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. जेईई, नीट, एनडीए, एमपीएसई, युपीएससी यासह अनेक परीक्षांमध्ये हे विद्यार्थी उत्तम गुणांनी उर्तीण होत आहेत. बारामतीमध्ये प्रशिक्षण घेऊन पोलीस खात्यात निवड झालेल्या मुला मुलींची संख्या शेकडोत आहेत.
रिद्धी वजरिंगीकर हिने राज्यात प्रथम येऊन राज्य आणि देशपातळीवर बारामतीच्या या शैक्षणिक मॉडेलचा दर्जा सिद्ध केला आहे.