नायक बारामतीच्या समृद्धीचे
घनश्याम केळकर / विक्रम जगताप
तांबड्या मातीचा हौदा, बाजूलाच मारुतीराया. हौद्यात लंगोट कसलेल्या पोरासोरांची दंगल. कट्ट्यावर जोर बैठका काढत घुमणारे आणि घामाने ओलेचिंब झालेले थोराड गडी. त्यांच्यावर लक्ष ठेवून एका कोपऱ्यावर बसलेले वस्ताद. आणि या सगळ्याकडे कौतुकाने पहात असलेले दोन चार गावकरी. हे हमखास दिसणारे चित्र पुर्वीच्या खेड्यातले. जेव्हा गावागात तालमी होत्या. गावची पोर त्या तालमीत घुमत होती आणि गावोगावच्या जत्रेतील कुस्त्यांच्या आखाड्यात उतरत होती. पण हळूहळू हे चित्र बदलत गेले. तालमी ओस पडल्या. त्यातल्याही हौशी घरातील पोरांनी कोल्हापूर, सांगली गाठली. काही काळापुर्वी या तालमीची जागा पत्त्याच्या अड्ड्यांनी घेतली. आता तर बहुतेक गावातून तालमीच्या जागाही अदृश्य झाल्या आहेत. आजकालची पोरे आता जीममध्ये जातात. आता या जीम गावागावात हातपाय पसरत आहेत.
पणदऱ्यातील संदीप लोखंडेंनी हा सगळा प्रवास अनुभवला आहे. ते तांबड्या मातीतील कुस्तीही खेळले आहेत, आणि मॅटवरची. जीममध्ये जाऊन शरीर कसे कमावता येईल याचे प्रात्यक्षिकासह धडे ते सध्याच्या पोरांना देत असतात. ऐवढेच नाही शरीरसौष्ठव स्पर्धा घ्यायची असेल तर नेमके काय काय काय करावे लागते याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. ऐवढे करुनही पुन्हा एकदा त्यांच्या मनातले कुस्तीचे मैदान त्यांनी पणदऱ्यात पुन्हा उभे केले आहे. काही माणस नादिक असतात. ते जगाची रुळलेली वाट चालत नाहीत, तर आपलाच स्वत:चाच रस्ता तयार करतात. ‘ हम जहां खडे होते है, लाईन वहांसे शुरु होती है ‘ सारखच थोडस. संदीप लोखंडे अशा माणसांच्या जातीतले आहेत.
कुस्ती त्यांच्या घरातच होती, त्याचे वडिल स्वत: पहिलवान आणि त्यांचे पहिले वस्ताद. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांचे पहिलवानकीचे शिक्षण सुरु झाले. पणदऱ्यातल्या नवमहाराष्ट्र विद्यालयात गेल्यावर तिथे मॅटवर कुस्तीचा सराव सुरु झाला. तिथे एम. टी. दडससर या क्रिडाशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. एकाचवेळी त्यांचा मातीमध्ये आणि मॅटवर दोन्ही प्रकारात कुस्तीचा सराव सुरु होता. सहावीपासून त्यांनी कुस्तीस्पर्धेत शाळेचे प्रतिनिधीत्व करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून शाळेत असेपर्यंत दरवर्षी शाळेला पदक मिळवून दिले. तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तरापर्यंत पदकांची लयलूट केली.
शाळेमध्ये असताना त्यांनी केलेला एक विक्रम अजूनही अबाधित आहे. त्यावेळी दंड बैठकाच्या स्पर्धा होत असत. पाचवी ते दहावी या पाच वर्षात या स्पर्धेत जोर मारण्यातील पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. नववीत असताना त्यांनी २१२१ जोर एका दमात मारले. त्यानंतरही त्यांना थांबायचे नव्हते. पण त्यांच्या शिक्षकांनाच काळजी वाटू लागली आणि त्यांनी त्यांना थांबवले, अन्यथा आणखी पाचशे हजार जोर मारण्याची त्यांची तयारी होती. मात्र हा २१२१ जोर मारण्याचा त्यांचा विक्रम त्यांच्या शाळेतील कोणताही विद्यार्थी आजवर तोडू शकलेला नाही. त्या वेळेचे त्यांचे मार्गदर्शक होते नव महाराष्ट्र हायस्कूलमधील एम टी दडस सर
शाळा संपल्यानंतर मातीतील कुस्तीचा सराव सुरुच राहिला. माळशिरस तालुक्यातील मगर निमगावच्या वस्ताद रावसाहेब मगर यांच्याकडे वर्षभर सराव केला. त्यावेळी माळशिरस, पंढरपूर परिसरातील मैदानात भाग घेतल्या. त्यावेळेस कधीच हार पत्करली नाही. त्यानंतर सरकारी तालीम, सांगली येथे कुस्तीचा सराव केला. व्यंकपा बुरुड हे गामा पहिलवानांच्या जोडीचा पैलवान तिथे होते. हिंदकेसरी मारुती माने यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. रघुनाथ दिंडे हा सांगलीकडील पैलवान महाराष्ट्र केसरीसाठी तयारी करत होता. त्याच्यासोबत सराव केला. थंडीच्या सिझनमध्ये सांगली परिसरात यात्रा जत्रांचा हंगाम असे, त्यावेळी तेथील मैदाने केली, उन्हाळ्याच्या दिवसात पुणे जिल्ह्याच्या परिसरात यात्रा जत्रांचा हंगाम असे. त्यामुळे जवळपास वर्षभर मैदानावर प्रत्यक्ष कुस्तीचा सराव होत असे.
इथुन पुढे सुरु झाला तो एका पहिलवानाचा वस्ताद होण्याचा प्रवास. व्यायाम आणि कुस्तीच्या क्षेत्रात पणदरे परिसरच नाही तर बारामती तालुक्यातही अशा अनेक बाबी आहेत, ज्या लोखंडेंनी पहिल्यांदा पणदऱ्यात घडवून आणल्या. २००६ साली त्यांनी पहिली शरीरसौष्ठव स्पर्धा पणदरे येथे घेतली. त्यावेळी अशी स्पर्धा बारामती शहरासह तालुक्यात कुठेच होत नव्हती. शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने होत असलेल्या या स्पर्धा २०१४ पर्यंत दरवर्षी होत होत्या. यासाठी पुण्यात अनेक हेलपाटे मारले मारुन माहिती मिळविली. निमय समजावून घेतले. त्यासाठी प्रशिक्षित पंच आणले आणि आठ वर्षे या स्पर्धा यशस्वी करून दाखविल्या. याची आर्थिक बाजू पुरी करण्यासाठी प्रत्येक वर्षी देणगीदार उभे केले, त्यामध्ये केशवराव जगतापांची भरीव मदत मिळाली. यातून पणदऱ्यातील युवकांमध्ये व्यायामाची क्रेझ निर्माण करण्यामध्ये संदीप लोखंडेंचा मोठा वाटा आहे.
पोटापाण्यासाठी लोखंडे साखर कारखान्यात काम करतात. पण त्यांचे खरे प्रेम हे व्यायाम आणि कुस्तीवरच राहिले आहे. सांगलीहून पणदऱ्यात आल्यावर त्यांनी क्षितिज फिटनेस सेंटर या नावाने जीम सुरु केली. ते २००० साल होते. तालीम करणे सगळ्यांनाच शक्य नाही. तालीमीसाठी खुप काळ मेहतन करावी लागले. जीम करून कमी काळात शरीर दिसू लागते, त्यामुळे युवकांचा ओढा तिकडे वाढू लागला. त्यामुळे तोपर्यंत तालमी जवळपास संपत आल्या होत्या. पण अजून आज दिसते तसे अद्ययावत जीमचे प्रस्थही वाढलेले नव्हते. बारामतीसारख्या शहरातही त्यावेळी फारशा जीम नव्हत्या. त्यावेळी पणदऱ्यात ही जीम उभी राहिली ती आजपर्यंत चालू आहे. पण आता या जीमचे रंगरुप बदलले आहे. आज एका प्रशस्त इमारतीत व्यायामाच्या अत्याधुनिक साधनांनी आता ही जीम सजलेली आहे. २०१५ साली ज्यावेळी नव्या जागेत या व्यायामशाळेची इमारत उभी करायची होती, त्यावेळीदेखील केशवबापूच मदतीला आले होते. त्यांनी दिलेल्या १ लाखाच्या मदतीवर ही इमारत उभी राहिली आहे.




पण आज त्यांची ओळख आहे ते कुस्तीचे मैदान भरविणारे संदीप लोखंडे म्हणून. मातीवरून मॅटवर आणी तिथून अत्याधूनिक व्यायामासाठीच्या जीमपर्यंत असा प्रवास झाला असला तरी त्यांचे खरे प्रेम हे कुस्तीच्या आखाड्यावरच होते. त्यामुळेच त्यांनी मित्रमंडळी व गावातील दानशूर देणगीदार यांच्या बळावर कुस्त्यांचे मैदान भरविण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले.
खरेतर गावागावात जत्रांच्या निमित्याने कुस्त्यांचे आखाडे भरत असतात. परंतू याखेरीज वेगळे कुस्तीचे मैदान भरविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पणदऱ्यात हे मैदान सुरु झाले. यामध्ये १२५ कुस्त्या झाल्या आणि यासाठी १२ लाखाचा खर्च झाला. यामध्ये ९ लाखाची तर पैलवानांना बक्षिसेच दिली. यासाठी विशेष पद्धतीने स्टेडीयम तयार केले. यात बाल्कनीसारखा उपक्रम केला. या मैदानात ५०० रुपयापासून सव्वा लाखापर्यंतच्या कुस्त्या लढविल्या गेल्या . सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील पैलवान यासाठी आले होते. एक नंबरची कुस्ती माऊली जमदाडे कोल्हापूर आणि भारत मदने यांची होती ती साधारण एक तास चालली होती. अमोल मिटकरी यांच्या हस्ते ही प्रथम क्रमांकाची कुस्ती लागण्यात आली होती. ते एक तास ही कुस्ती पाहण्यासाठी मैदानातच थांबून होते. हजारो लोकांची गर्दी हे मैदान पाहण्यासाठी उसळली होती. या मैदानासाठीही अड. केशवराव जगताप यांनी पहिल्या नंबरच्या बक्षिसासह सर्व प्रकारचे सहकार्य दिले. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या शाळेच्या मैदानावरच हा आखाडा भरला होता.
अशी मैदान भरवणे हे तसे पाहिले तर मोठ्या त्रासाचे काम आहे. एकतर यासाठी फार मोठा खर्च येतो. त्यासाठी देणगीदार मिळवण्यातच दीड महिना जातो. महिनाअगोदर तालमी तालमीत जाऊन पैलवानांकडे जाऊन कुस्त्या ठरवाव्या लागतात. त्यांची पॅम्लेट छापावी लागतात. प्रमुख पाहुणे ठरवावे लागतात, त्यांना भेटून त्यांच्या तारखा घ्याव्या लागतात.
यासोबतच प्रत्यक्ष मैदानात पहिलवानांना दुखापती होऊ शकतात, पंचाच्या निर्णयावरून वादविवाद होऊ शकतात. मुळातच या सगळा खेळ ताकदीचा. अंगात प्रचंड ताकद असलेले पहिलवान जसे यात उतरतात तसे तेवढ्यात ताकदीचे त्यांचे समर्थकही यासाठी येत असतात. या सगळ्यांना सांभाळणे हे मोठ्या कौशल्याचे काम असते. यासाठी पंच अत्यंत अनुभवी आणावे लागतात. जर कुस्ती चुकीच्या रितीने चालली तर ते लगेच हस्तक्षेप करतात. या मैदानावर त्यावेळी वाईवरुन खास हाडवैद्य उपस्थित होते. तसेच डॉक्टरसह रुग्णवाहिका जय्यत तयारीत मैदानाबाहेर उभी होती. लोखंडे स्वत: पहिलवान, अनेक मैदाने पाहिलेली, त्यामुळे अगदी बारीकसारीक गोष्टींकडेही त्यांनी लक्ष देऊन हे मैदान त्यांनी यशस्वी करून दाखवले.
कुस्त्याची मैदाने हे एकट्या दुकट्याचे काम नाही. जत्रा यात्रातील मैदाने ही गावाच्या पाठिंब्यावर उभी राहतात. याची जाणीव या मैदानात उतरणाऱ्या पहिलवानांनाही असते. त्यामुळे ते धाकात असतात. पण ज्यावेळी एखादा एकटा माणूस असे मैदान उभे करतो, त्यावेळी तो फार मोठा धोका पत्करत असतो. संदीप लोखंडे यांनी हा धोका पत्करला तो केवळ कुस्तीवर असलेल्या प्रेमामुळे.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन शब्दधन सोशल फाउंडेशन बारामती यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला. जीवन गौरव सेवाभावी संस्था देऊळगाव रसाळ यांच्यावतीने राज्यस्तरीय क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर सिद्धेश्वर सहकार संकुल यांच्या वतीने सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला
कुस्तीचा हा आखाडा दरवर्षी सजला पाहिजे असे कितीही वाटत असले तरी याबाबतच्या आज त्यांना फारशा आशा नाहीत. यासाठी दरवेळेस कुणाला गळ घालायची आणि का घालायची हा त्यांच्या मनातला सवाल आहे. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला आणि येथील माणसांच्या मनामनातला खेळ आहे, पण त्यासाठी स्वत:च्या खिशात हात घालण्याची किती जणांची तयारी आहे यावरच पणदऱ्यातील या आखाड्याचे भविष्य अवलंबून आहे.
या लेखाबाबतची आपली प्रतिक्रिया आपण संदीप लोखंडे यांना 97635 46784 या मोबाईल क्रमांकावर कळवू शकता.