आमदार संजय जगताप यांचा पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्याचा इशारा
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर. : इंदापूर काँग्रेस कमिटीच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून असणारी शहरातील मध्यवर्ती ठिकाणची भव्य इमारत ‘पाटील’ प्रमुख असणाऱ्या इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर झाल्याचे वृत्त समजताच एकच खळबळ उडाली. मध्यंतरी काँग्रेस कमिटीची इमारत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता,मात्र भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे मनसुबे उधळून लावले होते.
दरम्यान सद्यस्थितीला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून काँग्रेस कमिटीच्या नावात बदलाच्या आदेशाने इंदापूर तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या इमारतीच्या मालकी दाव्यासाठी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
पुणे सोलापूर या जुन्या महामार्गाच्या लगत तसेच इंदापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी काँग्रेसची भव्य अशी इमारत होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये असताना या इमारतीमध्ये सतत वर्दळ असायची.प्रदिर्घ राजकीय प्रवास या इमारतीने पाहिला आहे. आशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला, आणि इमारतीला उतरती कळा लागली. व काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या असणाऱ्या प्रवेशद्वारावरील लोखंडी घेतला कुलूप लावण्यात आले.
त्यानंतर ही इमारत कोणाची यासाठी दावे प्रतिदावे सुरू होऊ लागले. त्यानंतर काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष व विद्यमान पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी कागदपत्रांसह पक्षाचा फौज फाटा घेऊन काँग्रेसची इमारत कुलूप मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला लावलेले कुलूप तोडले.
यावेळी हर्षवर्धन पाटलांचे समर्थक व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची ही झाली. अखेर प्रसंग ओळखत पोलीस खात्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना चर्चेला बोलावले. कायद्याबाबत सूचना केल्या. यावेळी आमदार संजय जगताप, भाजप नेते हर्षवर्धन पाटील त्याचप्रमाणे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु हर्षवर्धन पाटलांच्या गनिमी काव्याने संजय जगताप यांना मोकळ्या हाताने परतावे लागले. आणि प्रकरण धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे गेले.
आता नुकतेच धर्मदाय आयुक्त कार्यालयाने याबाबत नाव बदलाचा आदेश दिला असल्याबाबतचे समजते. या आदेशावरून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर या नावे असलेली इमारत इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर ट्रस्ट मेघशाम वामनराव पाटील त्यांच्या नावे करण्याबाबत इंदापूर नगर परिषदेने जाहीर नोटीसीमध्ये प्रसिद्ध केले आहे. यामुळे इमारतीवरील काँग्रेसचा ताबा संपुष्टात आलेला दिसत आहे. आणि भविष्यात येथे काँग्रेसचा झेंडा उतरून भाजपचा झेंडा फडकल्यावर विशेष वाटायला नको.
दरम्यान काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांनी यावर पत्रकारांना जळजळीत प्रतिक्रिया दिली.. त्यांनी काँग्रेस भवन चोरल्या बाबत 420 चा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. आमदार संजय जगताप म्हणाले की, सरकारने 1972 साली काँग्रेस पक्षाला पक्ष कार्यालयासाठी सदर इमारत व जागा दिली मात्र 2015 साली तत्कालीन काँग्रेस मधील असंतुष्ट लोकांनी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्ट असा नावात बदल करून नोंद लावून घेतली आणि धर्मदाय आयुक्तांकडे दावा दाखल करून इंदापूर तालुका चारिटेबल ट्रस्ट असा नाव बदल आदेश घेतला. यामध्ये मोठी फसवणूक असून याबाबत 420 चा गुन्हा दाखल करणार आहे.
अर्थात कर्नाटकात काँग्रेस पक्षाने आपली ताकद वाढवली असली तरी इंदापूरमध्ये स्वतःचे काँग्रेस भवन वाचवण्यात काँग्रेसच्या पदरी अपयश आले असल्याची चर्चा रंगू लागली आहे. इंदापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद कमी आहे. मात्र काँग्रेस भवनची जागा मिळविण्यासाठी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष येणाऱ्या काळात होण्याची चिन्हे दिसत आहेत.