दिल्ली : महान्यूज लाईव्ह
घरात एक व्यक्ती विशेषतः आई एखाद्या असाध्य रोगाने पीडित असेल, तिचा आजार बरा होत नसेल, तर संपूर्ण घर खचतं. याचा अनुभव अनेकांना आला असेल.. अलीकडच्या काळात आरोग्य, कायदा यावर होणारा खर्च प्रत्येकाच्याच आवाक्यापलीकडे जाऊन पोहोचला आहे. दवाखान्यामध्ये प्रत्येक जण शरणागत असतो; पण तो खुद डॉक्टर असेल तर?.. हो.. तो सुद्धा एक माणूस असतो आणि म्हणूनच तो देखील परिस्थितीला शरणागतच असतो.
घटना माणुसकीचा अंत पाहणारी.. पत्नी कर्करोगाने पीडित असल्याने तिच्या खर्चासाठी भरपूर पैसा खर्च झाल्याने मेटाकुटीला आलेल्या डॉक्टर बापाची आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची आहे. उत्तराखंडमधील डॉ. इंद्रेश शर्मा यांच्या कुटुंबाची ही घटना आहे. डॉ. शर्मा हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथे एक खाजगी रुग्णालय चालवत होते.
त्यांच्या पत्नी कर्करोगाने पीडित होत्या. पत्नीच्या उपचारात त्यांनी त्यांच्याकडील उत्पन्नाचा सगळा हिस्सा तर खर्च केलाच, शिवाय अनेकांकडून उसनवारी देखील केली होती. ते पैसे देणे आता शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी मुलाचे शिक्षण देखील बंद केलं. मध्यंतरीच्या काळात मुलीचे लग्न झालं. मात्र मुलाचा शिक्षण बंद केल्याचा पश्चाताप डॉक्टरांना होत होता आणि ते नैराश्यात गेले.
अनेक विविध प्रयत्न करूनही आपण आता मूळ परिस्थितीला येऊ शकत नाही, याची जाणीव डॉ. शर्मा यांना झाली आणि त्यांनी एक निर्णय घेतला. ते संध्याकाळी घरी आले. सगळेजण जेवले. त्यांचा मुलगा ईशान याच्यासोबत ते लुडो खेळले, लुडो खेळत असतानाच त्यांनी मुलाला एक गोष्ट सांगितली. दोन इंजेक्शन दाखवले. आपण सर्वजण हे इंजेक्शन टोचून घेणार आहोत असे सांगितले.
मुलाला कल्पना आली. मुलाने ते इंजेक्शन आपल्याला आधी टोचावे अशी विनंती केली. डॉक्टरांनी ते त्याला टोचले देखील, पण हे इंजेक्शन टोचल्यानंतर मुलाला पुढे काहीच कळले नाही. सकाळी उठल्यानंतर त्याने आई-वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उठले नाहीत. मुलगा काय ते समजला. डॉक्टरांनी गुंगीचे इंजेक्शन फक्त मुलाला टोचले आणि जे विषारी इंजेक्शन होते, ते पत्नीला व स्वतःला टोचले होते. त्याचबरोबर एक चिठ्ठी देखील लिहिली. त्यामध्ये कोणालाही दोषी धरू नये असे लिहिले. मुलाला तर धक्का बसला होताच, पण लग्न होऊन गेलेल्या मुलीला देखील एक गोष्ट कळल्यानंतर तिच्यावर देखील आभाळ कोसळले.