राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
आरोग्याच्या बाबतीत दौंडचे आमदार राहुल कुल हे सजग आहेत. विशेषतः दौंड तालुक्यात त्यांना आरोग्यदूत आणि रुग्णमित्र असेही म्हणतात, तर केवळ उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना मदत करणे नव्हे, तर समोर दिसत असलेल्या घटनेतही मदतीचा हात पुढे करणाऱ्या राहुल कुलांचा प्रत्यय आज अनेकांना आला.
दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल हे दौंड तालुक्यातील आलेगाव येथे एका नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना दौंड – सिद्धटेक अष्टविनायक मार्गावर एका दुचाकी व चार चाकी वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांचा निदर्शनास आले. यावेळी आमदार कुल यांनी त्यांची गाडी तात्काळ थांबवली.
त्यांनी अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला त्यांच्या स्वतःचा गाडीतून दौंडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले, स्वतः रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णाला अत्यावश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिल्या. आमदार कुल यांनी दाखविलेल्या समयसूचकता व संवेदनशीलतेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
दरम्यान प्रशस्त अशा दौंड सिद्धटेक अष्टविनायक मार्गाचे काम झाल्यापासून या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून चारचाकी वाहने वेगाने धावतात. त्यामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.