बारामती : महान्यूज लाईव्ह
पाचवा प्रयत्न.. तिसऱ्यांदा मुलाखतीपर्यंत घेतलेली झेप आणि बारामतीचा प्रतीक अनिल जराड यूपीएससी परीक्षेत यशस्वी तर ठरलाच, पण देशात 112 वा क्रमांक पटकावला. बारामतीच्या प्रतीक ने बारामतीच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा खोवला.
बारामतीतील तुळजाराम चतुचंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व सांगलीतील राजारामबापू पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीची पदवी घेतलेला प्रतीक गेली काही वर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. बारामतीतील आयएसएमटी कंपनीत वरिष्ठ लिपिक पदावर असलेल्या अनिल जराड यांच्या या मुलाने हे उत्तुंग यश मिळवले.
प्रतीक गेली काही वर्षे दिल्लीमध्ये अभ्यास करत होता. त्याचा हा पाचवा प्रयत्न होता. त्यापैकी तीन वेळा त्याने मुलाखतीपर्यंत झेप घेतली. तिसऱ्या मुलाखतीत मात्र आता तो देशातील नागरी सेवेमध्ये लोकांची सेवा करण्यास तयार झाला आहे. येत्या काही महिन्यात तो आपली प्रशासकीय सेवा रुजू करेल, याचा काल बारामतीकरांना आनंद झाला. प्रतिकच्या कुटुंबियांना तर आनंद झालाच, पण बारामतीतील प्रत्येकाला हे यश कौतुकास्पद वाटले.