सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. १८) इंदापूर दौऱ्यावर असताना वरकुटे बुद्रुक येथे मांसाहार करून तेथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेऊन अभिषेक केल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाने या विषयावर खासदार सुळे यांना लक्ष्य करीत माफी मागण्याची मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या कृत्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीचे पाईक असणाऱ्या वारकरी सांप्रदाय आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
जामदार म्हणाले की, खासदार सुळे गुरुवारी (दि.१८) इंदापूर दौऱ्यावर असताना वरकुटे बुद्रुक येथील सदर घडलेल्या घटनेची खातरजमा केली असता सदर प्रकार घडल्याची माहिती समोर आली. संसदरत्न म्हणवून घेणाऱ्या खासदारांकडून हे निंदनीय असे कृत्य झालेले आहे. भाजपच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध करीत आहोत.
हिंदू धार्मियांच्या भावना दुखविण्याचे काम वेळोवेळी त्यांनी केले आहे. समस्त वारकरी संप्रदाय हा विठ्ठल रुक्मिणीची भक्ती करतात, त्यांच्या धार्मिक भावना या घटनेमुळे दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे खासदार सुळे यांनी या घटनेबाबत वारकरी सांप्रदाय आणि हिंदू समाजाची माफी मागण्याची गरज आहे. तसेच यापुढे त्यांच्या हातून हिंदू धर्मांच्या भावना दुखावण्याचे असे कृत्य पुन्हा घडू नये अशी सुदबुद्धी त्यांना मिळावी असे ॲड. शरद जामदार यांनी सांगितले.