विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : एखाद्या गोष्टीचा ध्यास आणि सामूहिक दृढनिश्चय समाजात महत्वपूर्ण बदल घडवून आणू शकतात. हे देशातील ग्लोबल शेपेर्स कम्युनिटीच्या बारामती हब ने सिद्ध करून दाखवले आहे.
बारामती हबच्या टीम मधून देवयानी पवार, शंतनू जगताप, माऊली खाडे, खदिजा कायमखानी, अखिल सुर्यवंशी आणि फातेमा कायमखानी हे साउथ एशिया २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी होणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पुरस्कृत ग्लोबल शेपर्स कम्युनिटीद्वारे आयोजित केलेल्या ह्या उपक्रमामध्ये क्लायमेट चेंज रोखण्यासाठी बारामती व आसपासच्या परिसरात हबने केलेले काम ते सादर करणार आहेत.
साउथ एशिया सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बारामती मधील ग्रामीण भागातील तरुणांना प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी नक्कीच आशादायी आहे. बारामती हबने घेतलेल्या उल्लेखनीय उपक्रमांपैकी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम या समावेश आहे. तसेच ४००० पेक्षा जास्त देशी झाडांचे वृक्षारोपण केले आहे.
दुष्काळग्रस्त भागात वनजमिनीवर १००० पेक्षा जास्त सीडबॉल्सचा उपक्रमही राबविण्यात आला. बारामती हबने मानसिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, हवामान बदल आणि जैवविविधता संरक्षण यांसारख्या क्षेत्रातही काम केले आहे.बारामतीच्या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास कसा होईल याचा प्रामाणिक प्रयत्न बारामती हबचे सर्व शेपर्स करत आहेत.