दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईतील माेबाईल शाेरुममधील कर्मचाऱ्याने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याची आत्महत्या कोणालाच कळाली नाही. त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
याप्रकरणी समीर रशीद बागवान (वय वर्ष ४८) यांनी वाई पोलिसांत खबर दिली. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सिकंदर अमीन अतार (वय वर्ष ३० मुळ रा. औंध ता. खटाव सध्या रा. मधली आळी, सिद्धिविनायक अपार्टमेंट वाई) याने राहत्या घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली.
सिकंदर हा एका माेबाईल शाेरुममध्ये नोकरीला होता. ताे १६ मे पासूनच गायब होता. तसेच त्याने आत्महत्या करणार असल्याचे बऱ्याच जणांकडे माेबाईलव्दारे सांगितल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींकडून बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
फ्लॅटचा दरवाजा तोडून आत गेल्यानंतर मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनेची नोंद पोलिसांत झाली असून आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.