दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील खानापुर गावात ग्रामपंचायत, सोसायटी व गावसहभागातून ग्रामस्थांनी तब्बल 15 लाख रुपयांची लोकवर्गणी गोळा करून गावात श्री विठ्ठल रुक्मिणी गणपती व लक्ष्मी मातेचे मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावात या मूर्तींच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन ग्रामस्थांनी केले.
पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ओझर्डे सोमेश्वर या परिसरातील पवित्र कृष्णा नदीच्या घाटावर या मूर्तींना महाअभिषेक घालून व मंत्रपठण करून या मूर्तींची परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
या मुर्त्यांच्या महाभिषेका वेळी संपूर्ण गावातील महिला व पुरुष भाविक उपस्थित होते ट्रॅक्टर मधून या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली या निमित्ताने गावातील प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी करण्यात आली होती. पारंपरिक लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेली मिरवणूक ग्रामस्थांचा उत्साह वाढवणारी होती.