सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : केंद्र व राज्य सरकारने कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्यास सहकार्य केल्याने आता कर्मयोगी व निरा भिमाचा आर्थिक अडचणीचा काळ हटणार आहे. या दोन्ही कारखान्याची ऊस बिले येत्या 20 दिवसात म्हणजे दि.5 जून पूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. त्यामुळे ही दोन्ही कारखाने गतवैभव प्राप्त करतील असा विश्वास भाजपनेते व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व नीरा भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्मयोगी व निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळांची बैठक पार पडल्यानंतर हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
या दोन्ही कारखान्यांना गेली दोन-तीन वर्षापासून खेळत्या भांडवलाअभावी आर्थिक अडचणीचा काळ निर्माण झाला होता. मात्र आता या दोन्ही कारखान्यांना केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने खेळते भांडवल उपलब्ध होणार असल्याने, या दोन्ही कारखान्यांचे पुन्हा चांगले दिवस येत आहेत. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, प्रत्येक साखर कारखान्यास चढउताराचा काळ हा असतो. आपल्या भागातील अनेक कारखाने यापूर्वी अडचणीत होते, मात्र सध्या त्या कारखान्यांनी गत वैभव प्राप्त केले आहे.तसेच आगामी काळात कर्मयोगी व निरा भीमा हे कारखाने वैभव प्राप्त करतील. असे त्यांनी ठामपणे सांगितले
कारखान्याने अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी ॲडव्हान्स दिले आहेत. तसेच या दोन्हीं कारखान्यांनी ऊस तोडणी व वाहतुकीची सर्व बिले अदा केली आहेत. गेली 34 वर्षे कर्मयोगी व 22 वर्षे निरा भीमाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. हाच विश्वास हीच आमची शिदोरी आहे. त्यामुळे कर्मयोगीची मालमत्ता तब्बल 600 कोटी व निरा भिमाची मालमत्ता 400 कोटींची झाली आहे. आता दोन्ही कारखान्यांना खेळते भांडवल उपलब्ध होणार असल्याने, आगामी गळीत हंगाम हे उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीने पार पडतील, असे हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी सांगितले.