सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : कर्मयोगी व निरा भीमा कारखान्यास विना परवाना गाळप केल्याबद्दल 22 कोटी दंडाची नोटीस आली त्याच्या बातम्या आल्या. या संदर्भातील दंडाच्या नोटिसा हा कामकाजाचा भाग असतो. अशा दंडाची वसुली होत नाही. यासंदर्भात दोन्ही कारखान्यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले आहे. मी सहकारमंत्री असताना प्रत्येक वर्षी असे कोट्यावधी रुपयांचे दंड रद्द केले आहेत. त्यामुळे नोटीस च्या बाबतीत घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी विरोधकांकडून केले जात असलेल्या राजकारणावर हल्ला केला.
कर्मयोगी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, एखादी संस्था स्थापन करून ती यशस्वीपणे चालविण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट व त्रास सहन करून, वेळ द्यावा लागतो, तसेच अनेक वेळा इतरांचा वाईटपणा घ्यावा लागतो, हे आंम्ही शेतकऱ्यांसाठी केले आहे व आगामी काळातही करीत राहू. विरोधकांनी मात्र तालुक्यात सहकार क्षेत्रात एकही संस्था उभी करून चालविलेली नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
इंदापूर तालुक्यामध्ये साखर कारखाने, जिल्हा बँक, दूध संघ, बाजार समिती आदी अनेक सहकारी संस्थांचे कामकाज करीत असताना राजकारण न आणण्याची परंपरा आहे. कारण या संस्था शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये निवडणूक वगळता राजकारण न आणण्याची परंपरा सर्वांनी कायम ठेवावी, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
यावेळी कर्मयोगी व निराभिमा कारखान्याचे संचालक उपस्थित होते.