विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
रूपाली सचिन माने अर्थात ताई हरदास कांबळे या यशस्विनीची ही कहाणी.. तशी पाहिलं तर अनेकांना ती कहाणी आजूबाजूची, आपल्या भोवतालची वाटू शकते! हो, गेली पाच दशके महिला सबलीकरणासाठी अहोरात्र जिथे ज्ञानयज्ञ सुरू आहे, अशा एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या आवारात तिच्या करिअरचा श्री गणेशा झालाय.. आज ती जिंकली आहे, पण मागे वळून पाहताना तिची कहाणी ऐकली की, नव्या पिढीतील अनेकींना तिच्यापासून नक्कीच प्रेरणा घ्यावीशी वाटेल.. नुकत्याच राज्यात झालेल्या मेगा पोलीस भरतीमध्ये ताई हरिदास कांबळे ही महिला पोलीस बनली आहे..!
शारदा महिला भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण अकॅडमी मध्ये यावर्षी सर्वाधिक महिला पोलीस भरती झाल्या आहेत. त्यातील काहींच्या कहाण्या ऐकण्यासारख्या आहेत आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासारख्याही आहेत. त्यापैकीच ही एक ताई! दोन मुलं पाठीशी असताना, शिक्षण सोडून दहा वर्षाचा गॅप पडलेला असताना आणि चक्क डीएड पर्यंत शिक्षण घेऊनही शिक्षक पदाची स्वप्न पूर्ण न होऊ शकलेल्या ताईचा प्रवास मास्तरकीकडून थेट पोलीस पदाकडे पोहोचला आहे..!
ताई सांगत होती 2010 मध्ये तिचं लग्न झालं.. शेतामध्ये काम करावे लागायचं.. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत शेतात मशागतीची काम केल्यानंतर वेगळं काही करावं करायला मिळेल अशी अशाच सोडून दिली होती. त्यातच मूल झालं आणि त्यानंतर मुलगी! बऱ्याचदा वाटायचं की, घेतलेलं शिक्षण लक्षात घेता काहीतरी करिअर करावं. पण काही घडेल असं वाटतच नव्हतं. अशातच youtube वर फौजदार बनायचं कसं अशी एक क्लिप पाहिली आणि माझ्या मनात करिअरच्या नवीन कल्पना सुचल्या.
घरच्यांचा सुरवातीला विरोध होता, पण तरीही यात उतरायचं असं ठरवलं. पुण्यालाही जाऊन आले. मात्र मध्येच कोरोना आला आणि सारं काही थंडावलं. त्यानंतर मात्र मैत्रिणींनं शारदानगरचा पत्ता दिला आणि शारदानगर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं अशी माहिती मिळाली आणि मग इथे आले.
इथे आल्यानंतर ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा वहिनी यांनी आधार दिला विश्वास दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मनातील जिद्द पाहिली आणि त्याला पाठबळ दिले सुरुवातीला मैदान करण्यासाठी शारीरिक क्षमता दाखवण्यासाठी खूप त्रास व्हायचा मग संस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विविध वैद्यकीय तपासण्या केल्या आणि माझी कुपोषणाची समस्या जाणून घेऊन त्याद्वारे सर्व प्रकारचा आहार देऊन माझी तयारी करण्यात आली आणि जिथे मैदानी चाचणी मध्ये मला फक्त दहा गुण मिळायचे तिथे मी आज 43 गुण मिळवून पोलीस भरती उत्तीर्ण झाले.
सौ. सुनंदा पवार, विश्वस्त एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती : मुलगी वाढली पाहिजे, शिकली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. पण अलीकडे धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला, मुलींच्या समस्या वाढत आहेत. शारदा ट्रेनिंग अकॅडमी मध्ये रूपाली जेव्हा आली, तेव्हा तिच्या अशाच काही समस्या होत्या. डीएड पर्यंत शिक्षण घेऊनही तिला शिक्षकाचा जॉब करता आला नाही. दुसरी गोष्ट दोन मुलं झाली होती. मात्र तिची जिद्द अखंड होती, अभंग होती. अशातच तिच्या कुपोषणाच्या काही समस्या आमच्या निदर्शनास आल्या. त्यावर आम्ही सर्वांनी जास्त लक्ष दिले. हे पाहून तिनेही तिची इच्छाशक्ती आणि जिद्द कायम ठेवली. दोन मुलं झाल्यानंतरही आपल्याला करिअर करता येतं हे तिनं त्यातून दाखवून दिलं. आज ती पोलीस झाली आहे याचं खूप आनंद आणि समाधान आहे.