किरण माने, अभिनेते
…हरीहरनची गाण्यांची लाईव्ह मैफल जशी नजाकतीत इकडं तिकडं वळणं, गिरक्या, उसळी घेत रंगते ना… तशी परवा बारामती साहित्य कट्ट्यावरच्या गप्पांची मैफिल लै साॅल्लीड रंगली ! खचाखच भरलेला हाॅल… माझ्यावरच्या प्रेमापोटी वेळ काढून आलेले… तब्बल तीन तास जिवाचा कान करून मला ऐकणारे प्रेक्षक… वेळोवेळी होणारा टाळ्यांचा कडकडाट, कधी पाणावलेले डोळे टिपणारे हात… हे सगळं पाहून अक्षरश: भारावून गेलो !

…मुलाखतकार शशांक मोहिते आधी एकदा म्हणाले होते की, ‘नाटक, सिनेमा सिरीयलमधला आपला आवडता अभिनेता म्हणून लोक तुम्हाला जीव लावतातच… पण त्याही पलीकडे जाऊन किरण मानेंची एक ओळख त्यांनी मनामेंदूत जपलीय, ताठ कणा आणि निर्भिड बाणा असलेला आपला माणूस !’ हे ऐकताना मला ही अतिशयोक्ती वाटली होती. पण जेव्हा हा ‘नजारा’ पाहिला तेव्हा विश्वास बसला.

…डाॅ. आ.ह. साळुंखे तात्यांच्या पुस्तकांचे संस्कार… तुकाराम गाथेतून अनुभवलेला डॅशिंग तुकोबारायाचा विद्रोह… डाॅ. नरेंद्र दाभोळकरांच्या सहवासातून नकळत्या वयात नकळत लाभलेली विवेकनिष्ठ विचारसरणी… पं. सत्यदेव दूबेजींमुळे ‘अभिनय’ या प्रकाराबद्दल आलेलं अभ्यासपूर्ण गांभीर्य… या सगळ्या गोष्टींवर शशांक मोहीतेंनी कौशल्यानं मला बोलतं केलं.
खरंतर त्यामुळेच गणगोतांशी गुजगोष्टी कराव्यात तसा माझा प्रवास मी स्वच्छपणे उलगडू लागलो.. काहीही न लपवता… अगदी माझ्या तरूणाईतल्या लव्ह अफेअर्सपासून ते कधीकाळी आलेल्या नैराश्यातून व्यसनाच्या आहारी जाण्यापर्यन्त… मला सिरीयलमधून काढुन टाकण्याच्या काॅन्ट्रोव्हर्सीपासून ते माझ्या राजकिय, वैचारीक भुमिकांपर्यन्त… बिगबाॅसमधल्या जीव ओतून खेळलेल्या टास्कपासून ते राखी सावंतसोबत केलेल्या गंमतीशीर फ्लर्टपर्यन्त… सगळ्यांवर मनभरून बोललो.
माझ्या आयुष्यातली चिंचणी-मायणी, सातारा आणि मुंबई ही महत्त्वाची स्थलांतरं…मायणीतल्या टुरींग टाॅकीजच्या तंबूत पहिल्यांदा पाहिलेले आणि आजवर मनामेंदूवर गारूड असलेले निळू फुले, दादा कोंडके, अशोक सराफ, अमिताभ बच्चन.. लहानपणी घराच्या अंगणात सादर केलेली शाहीर साबळेंची लोकनाट्यं… यात्रेत पाहिलेली विठा भाऊ मांग, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, लहानगा नितिन बनसोडे यांची भन्नाट, नादखुळा वगनाट्यं… काॅलेजकाळात लागलेला नाटकाचा छंद, जी पुढे ‘पॅशन’ झाली… प्रायोगिक रंगभूमी ते व्यावसायिक रंगभूमी असा झपाटल्यासारखा प्रवास…त्यानंतर गाजलेल्या सिरीयल्स.. सिनेमा क्षेत्रातली स्वप्नं… काय-काय सांगू? असं झालंवतं.
काॅलेजकाळात लाभलेला नरेंद्र दाभोळकरांचा शेजार. नरेंद्रकाकासोबत सातारला त्यांच्या घरी येऊन सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे निळू फुले, डाॅ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांना पाहून चकीत झालेला मी… ‘नाटकासिनेमात कामं करता-करता हे इथं कसे? कलाकारांचा अशा चळवळीशी काय संबंध?’ असे प्रश्न पडून निळूभाऊंचं भाषण ऐकायला गेलेला मी… ‘कलावंताला समाजभान असलंच पायजे.’ असं ठासून सांगणार्या निळूभाऊंच्या विचारांनी भारून गेलेला मी… ‘लोकायत’ नाट्यसंस्थेमुळे सहवासात आलेले आ.ह.तात्या… आणि बदलून गेलेलं आयुष्य !
मी भरभरून बोलत होतो… लोक भान हरपून ऐकत होते… मध्येच आपसूक सवयीनं शेरोशायरी यायची माझ्या तोंडी… प्रेक्षकांमधून ‘वाह वाह’ आली की भारी वाटायचं.. निदा फ़ाज़ली, ज़ौक़, मीर तक़ी मीर, ग़ालिब, ग़ुलज़ार, जावेद अख़्तर, मजरूह सुल्तानपुरी, इलाही जमादार यांचे शेर… तुकोबांच्या अभंगांपासुन माझा मित्र शाहिर थळेंद्र लोखंडेच्या कवितांपर्यन्त खूप काही ऐकवत होतो…
परवाची संध्याकाळ खर्या अर्थानं जबराट, भन्नाट, नादखुळा ठरली… मी आयुष्यात तो माहौल विसरू शकणार नाही. शशांक मोहिते, मेहबूब कोरबू, पंकज पाटणकर, डाॅ. सुजित अडसूळ आणि सहकार्यांनी माझं जे आदरातिथ्य केलं ते तर मला अक्षरश: ‘सातवे आसमान पर’ नेऊन ठेवणारं होतं.