शिरूर : महान्यूज लाईव्ह
जांबूत (ता. शिरूर) येथे शेततळ्यात पडून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सत्यवान गाजरे (वय.२५) व राजवंश गाजरे(वय.दीड वर्षे) असे मयत झालेल्या बापलेकांची नावे आहे. या बापलेकाला वाचवण्यासाठी पत्नीने मारलेली उडी मात्र अपयशी ठरली.
याबाबत रूषिकेश दिगंबर झिंजाड यांनी आळेफाटा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. राजवंश व पती सत्यवान यांना वाचवण्यासाठी उडी मारलेल्या आईला वाचविण्यात यश आले.
जांबूत ( पंचतळे ) येथील बेल्हा – जेजूरी राज्यमार्गालगत शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणी कुटूंबासह ते रहातात. रविवारी ( दि.३०) रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सत्यवान शिवाजी गाजरे ( वय २५ वर्षे ),पत्नी स्नेहल, मुलगा राजवंश (वय दीड वर्षे) यांच्यासह शेतात होते.
त्यांची नजर चुकवत खेळताना राजवंश हा स्विमिंग टंँकमध्ये (तळ्यात) पडला असता, वडील सत्यवान शिवाजी गाजरे याने चिमुकल्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने तेदेखील बुडू लागले. यावेळी सत्यवान यांची पत्नी स्नेहल हिने पती व मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली.
मात्र तीही पाण्यात बुडू लागल्याने तिच्या ओरडण्याच्या आवाजाने किरण गाजरे, प्रविण गाजरे व इतरांनी घटनास्थळी धाव घेत आणि बुडत असलेल्या स्नेहल हिला बाहेर काढले तसेच राजवंश व सत्यवान यांनाही बाहेर काढून आळेफाटा येथे उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची माहिती कळताच जांबूतसह परिसरात शोककळा पसरली असून पिता पुत्राच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मयतांचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात जांबूत (ता.शिरूर) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.