शिरूर : महान्यूज लाईव्ह
चहा विक्री करत उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत मोठी मदत केली असून पुन्हा संसार उभा केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, मांडवगण फराटा येथील हरिभाऊ फराटे हे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ मांडवगण फराटा परिसरात चहा विक्री चा व्यवसाय करत आहे.त्यांचे नुकतेच चार दिवसांपूर्वी घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले होते. घरात कोणीही नसताना ही घटना घडली होती.
जळीत घटना घडल्या नंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले होते. मदतीची गरज असताना मांडवगण फराटा ग्रामस्थांनी पुढाकार घेत मदत सुरू केली. रिटेल व्यापारी संघाने आर्थिक मदत गोळा करत ३५ हजार रुपयांचा धनादेश दिला. गावातील अनेकांनी संसारोपयोगी साहित्य दिले. कुणी भांडी दिली तर कुणी किराणा दिला. या संसारोपयोगी वस्तू,भांडी व इतर दिलेल्या मदतीने संपूर्ण कुटुंब भारावून गेले.
यावेळी बोलताना हरिभाऊ फराटे म्हणाले की,नेहमी चहा विक्री करत असताना प्रामाणिकपणा ठेवला. त्याचबरोबर सामाजिक भावना ठेवत अनेकांना मदत केली. मात्र स्वतः संकटात असताना गावातील सर्व ग्रामस्थ पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. व्यापारी संघाने देखील भरीव मदत केली. यामुळे पुन्हा जगायला उभारी मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रिटेल व्यापारी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष प्रवीण चोरडिया, दौंड तालुका अध्यक्ष संतोष शेलोत, किरण शिंदे, अशोक शहाणे, अप्पा वाव्हळ आदी उपस्थित होते.