विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
उन्हाळा सुरू होताना किंवा इतर वेळी देखील महावितरणच्या चुकीमुळे किंवा विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांची पिके जळतात. बऱ्याचदा पाठपुरावा करता येत नाही, म्हणून ही प्रकरणे तशीच थांबतात. पण सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाने आणि जळीत उसाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लढत अशी दिली, की महावितरणला भरपाई द्यावीच लागली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांनी कारखान्याचा विश्वस्त म्हणून आनंदराव टकले या ऊस उत्पादकाच्या पाठीशी उभा राहून या संदर्भात केलेला पाठपुरावा व सदस्य मार्गाने दिलेली लढत यामुळे महावितरण ला दोन लाख 11 हजार रुपयांची भरपाई टकले यांना द्यावी लागली.
आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा भरपाईचा चेक टकले यांना सुपूर्द करण्यात आला. टकले यांना दोन लाख 11 हजार रुपयांची भरपाई द्यावी लागल्यानंतर महावितरणने टकले यांच्याकडील महावितरणची थकबाकी जमा करून घेऊन उर्वरित एक लाख 67 हजार रुपये टकले यांना परत केले.
सन 2021 22 नंतर सस्तेवाडी गावातील कदम वस्ती येथील सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद सतीश हरिभाऊ कदम यांचा महावितरण च्या वीज वाहकतारांच्या घर्षणामुळे जळीत झाला होता. कारखाना गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी २० दिवस अगोदर सस्तेवाडीचे सभासद आनंदराव जगन्नाथ टकले यांचाही दोन एकर ऊस याचं कारणाने जळीत झाल्याचे समजले.
या दोन्ही घटना लक्षात आल्यानंतर संचालक ऋषी गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून या प्रकरणांची नुकसान भरपाई शेतकऱ्याला, सभासदांना देण्यात यावी अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सांगितले आणि कागद पत्रांची पूर्तता केल्यानंतर जर महावितरण जबाबदार असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगीतले.
मग ३० नोव्हेंबर २०२१ पासून सभासदांना बरोबर घेत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला तब्बल दोन वर्षानंतर ३ जानेवारी २०२३ मधे कारखान्याचे सभासद श्री.आनंदराव जगन्नाथ टकले यांना महावितरण कंपनीकडून २ लाख ११ हजार ७९७ रुपये मंजूर झाले.
ऋषिकेश गायकवाड, संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना – बऱ्याचदा शेतकऱ्याचा काहीही दोष नसताना व महावितरणची चुकी असताना देखील केवळ पाठपुराव्याअभावी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडते. बऱ्याचदा शेतकरी देखील मध्येच हा विषय सोडून देतात, परंतु आम्ही ठरवले आहे; सोमेश्वर कारखान्याच्या परिसरात कुठेही असा प्रकार घडला, तर आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून या प्रकरणाच्या पाठपुरावा अगदी तडीस नेऊ.