दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : केंजळ (ता वाई) येथील अपूर्व कदम यांची महाराष्ट्र शासनाच्या सी एम फलोशिप कार्यक्रमांतर्गत नुकतीच आयुक्त, मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे वर्ग -१ पदी निवड झाली आहे . त्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत सहावे स्थान प्राप्त केले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण नवीन मराठी शाळा वाई येथे झाले. इयत्ता चौथी मध्ये त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली होती. जवाहर नवोदय विद्यालय खावली ( सातारा) येथे सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण तर अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षण दिशा अकॅडमी वाई येथे केले. बारावी विज्ञान शाखेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मॅकेनिकल इजिनिअरिंगची पदवी आर आय टी इस्लामपूर येथे विशेष प्राविण्यासह प्राप्त केली . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मेंटॉर म्हणून काम केले आहे .
अपूर्व हे जि प . प्राथमिक शाळा धावडी येथे कार्यरत पदवीधर शिक्षिका सौ छाया जयवंत कदम व जि . प .शाळा कणूरचे मुख्याध्यापक श्री जयवंत विनायक कदम यांचे सुपुत्र आहेत. या यशामध्ये त्यांचे चुलतबंधू कोरेगावचे तहसीलदार श्री अमोल रमेश कदम यांची प्रेरणा आहे .
अपूर्वच्या या उज्जवल यशाबद्दल तालुक्याचे आमदार मकरंद पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, पंचायत समिती वाईचे माजी उपसभापती अनिल जगताप, प्रवीण जगताप, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महादेव मसकर, जि प चे माजी सदस्य शशिकांत पवार, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने, विद्यमान संचालक नितीन फरांदे, केंजळचे सरपंच मिलिंद गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, जिल्हा व तालुका स्तरावरील विविध संघटनाचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग,सुरेश जगताप, शिवाजीराव जगताप, अरविंद येवले, अभिजित जगताप, उदय कदम तसेच केंजळ ग्रामस्थ व वाई तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू – भगिनींनी अभिनंदन केले .