पोलिसांनी अमोल बनकरसह त्याच्या तीन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या.. दोन गुन्हे उघडकीस तर सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : सन २०१० मध्ये साथीदाराच्या मदतीने एका ग्रामसेवकाचे अपहरण करून खुन करणा-या आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना आरोपी सन २०१९ साली कारागृहातून पळून गेला.. पोलीस खाते सर्वत्र शोध घेत असताना, इंदापूर पोलिसांना त्याचा सुगावा लागला.. मग काय इंदापूर पोलिसांनी बरोबर सापळा रचला आणि आरोपी अमोल बनकर व त्याच्या तीन साथीदाराच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अमोल अंबादास बनकर (वय ३१ रा.काटी ता.इंदापूर जि.पुणे) असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अमोल अंबादास बनकर (वय ३१ रा.काटी ता.इंदापूर जि.पुणे) याने सन २०१० मध्ये त्याच्या साथीदारासह एका ग्रामसेवकाचे अपहरण करून खुन केला. त्यांच्यावर नातेपुते पोलीस ठाणे (जि.सोलापूर) येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरच्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी अमोल बनकर यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपी अमोल बनकर हा पैठण कारागृहात खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना सन २०१९ मध्ये तो कारागृहातून पळाला. कारागृहातून तो पळाल्यामुळे त्याच्यावर पाचोड पोलीस ठाणे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
अद्यापपर्यंत अमोल बनकर हा फरारीच होता. आरोपी अमोल बनकर इंदापूरमध्ये येणार असल्याबाबत गुन्हे शोध पथकास गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शोध पथकाने अमोल बनकर याला हेरुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने त्याचे तीन साथीदार आदेश बाळू बोराटे (वय २३ रा. काटी ता. इंदापूर जि. पुणे), शुभम महादेव इनामे (रा. काटी ता. इंदापूर), गणेश रामचंद्र इनामे (वय २२ रा. नरुटवाडी ता. इंदापूर) यांच्यासह वरकुटे येथील एक दुकान फोडून त्यातील वस्तू चोरी केल्याचा तसेच पळसदेव (ता.इंदापूर) येथून दोन जर्सी गाय चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून हे गुन्हे उघडकीस आणले असून सर्व आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन जर्सी गाय, दुकानातील चोरी केलेल्या वस्तू, एक पिक अप, एक एच एफ डीलक्स मोटर सायकल असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे , नागनाथ पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, पोलीस नाईक सुकुमार भोसले, सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, गजानन वानुळे, विकास राखुंडे यांनी केली.