दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक!
राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दौंड राष्ट्रवादीने काँग्रेसने महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट ) व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकही जागा न सोडल्याने घटक पक्षांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांना कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत सर्व जागांवर उमेदवारीची संधी मिळाली आहे.
परिणामी, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे हे आपल्या समर्थकांना जागा वाटप करण्यात आणि कुल यांच्यावर दबाव आणण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांनी आणि भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल व वासुदेव काळे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पुन्हा एकदा आमने-सामने निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात रमेश थोरात गटाने एकहाती सत्ता मिळवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व कायम राखले.
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप अर्थात आमदार राहुल कुल यांनी आपला पॅनल उभा करीत सर्व जागांवर उमेदवार उभे करून राष्ट्रवादीला शह देण्यासाठी कंबर कसली आहे. यंदा ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठित केली आहे. असे असले तरीही भाजप आणि राष्ट्रवादीला नाराज कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळत उमेदवारी अर्ज मागे घेतले, मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास सांगणे व परत ते अर्ज मागे घेण्याचे आदेश देणे हा कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना अनेक उमेदवारी अर्ज मागे घेतलेले कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घ्यायचाच होता तर मग उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सांगितले तरी कशासाठी ? असे प्रश्न दोन्ही पक्षांचे नाराज कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. भाजपमध्ये आमदार राहुल कुल आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी या निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वासुदेव काळे यांच्या समर्थकांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देण्यात आल्याने काळे यांच्या समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
आमदार राहुल कुल यांच्या जागा वाटपावरून झालेल्या चर्चेत कुल यांच्यावर दबावतंत्राचा वापर करण्यात आणि आपल्या समर्थकांना जागावाटपात न्याय देण्यात काळे हे अपयशी ठरले असून सर्व जागांवर आमदार कुल यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. तसेच भाजपसोबत युतीत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना गट, शिवसंग्राम तसेच युतीतील इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही या उमेदवारी पासून वंचित ठेवल्याची चर्चा आहे.
दौंड भाजपसारखीच परिस्थिती दौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस,काँग्रेस आय, शिवसेना (ठाकरे गट) हे इतर काही घटक पक्ष सहभागी आहेत. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पातळीवरील नेत्यांनी शिवसेना व काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात व विचारात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश पासलकर व काँग्रेसचे नेते विठ्ठल दोरगे यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश थोरात, पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार व दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांनाच संगनमताने उमेदवारी दिली आहे. अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या अनेक नाराज कार्यकर्ते सध्या या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, भाजप व राष्ट्रवादी हे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात जरी एकमेकांच्या विरोधात उतरले असले, तरी आपल्याच कार्यकर्त्यांची अंतर्गत बंडाळी व नाराजीचे ग्रहण कसे सोडविणार? ही नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाचे पारडे जड करणार ? हे मात्र मतदान निकालानंतरच स्पष्ट होईल.