मामा पुन्हा आमदार व्हावा म्हणून कार्यकर्त्याने केला होता नवस..! आमदार भरणे यांच्या वजनाची पेढेतुला करून केला नवस पुर्ण ! पडस्थळच्या रामभाऊ मारकड यांची पंचक्रोशीत चर्चा.
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : दत्तात्रय भरणे पुन्हा आमदार व्हावेत म्हणून पडस्थळमधील रामभाऊ मारकड यांनी भरणेंच्या वजनाच्या पेढ्याचा नवस केला आणि अडीच वर्षांनंतर यंदाच्या वर्षी त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना बोलावून त्यांच्या वजनाइतके म्हणजे तब्ब्ल ८९ किलोंची पेढेतुला करून तो नवस पुर्ण केला.
भरणे यांचा स्वभाव, राजकारणाची पध्दत आणि त्यांचा साधेपणा हा अगदी लहान मुलांपासून अबालवृध्दांपर्यंत सर्वांनाच भावतो. साधारणपणे नव्वदच्या दशकापासून आमदार भरणे हे राजकारणात सक्रीय आहेत.तेव्हा पासून ते आजतागायतपणे त्यांनी सामान्य माणसाची नाळ तूटू दिली नाही. केवळ राजकारणासाठी राजकारण न करता प्रत्येकाच्या सुख-दु:खात आमदार भरणे धावून जात असल्याने त्यांचे तालुक्यातील प्रत्येक कुटूंबाशी आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
अगदी गाव पातळीवरचा साधा कार्यकर्ताही त्यांना थेट संपर्कात असतो. मंत्री असताना किंवा आता आमदार असताना सुद्धा कोणताही बडेजावपणा न करता ते कधी जत्रेच्या पंगतीला जेवताना दिसतील,कधी लहान मुलांसोबत खेळताना दिसतील तर कधी शाळेच्या स्नेह संमेलनात शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबर नृत्य करताना दिसतील,तर कधी कार्यकर्त्यांच्या मोटार सायकलवर फेरफटका मारताना दिसतील.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार दत्तात्रय भरणे यांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते बाहेर पडले होते.त्यामुळे दत्तात्रय भरणे एकटे पडले होते. परंतु सामान्य कार्यकर्ता आणि गावागावातील गोरगरिब जनता मात्र दत्तात्रय भरणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. अशा संकटाच्या काळात आपल्या नेत्याला पुन्हा आमदार करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. काहींनी नवस केले. असाच नवस पडस्थळमधील रामभाऊ मारकड यांनी केला होता.
पडस्थळ गावातील श्री. कोटलिंगनाथ देवस्थान नवसाला पावणारे म्हणून उजनी परिसरात परिचित आहे. त्यामुळे आपला नेता पुन्हा आमदार व्हावा या भावनेने रामभाऊ मारकड यांनी कोटलिंगनाथ चरणी नवस केला होता. यांच्यासारख्या अनेक सामान्य माणसांची श्रध्दा खरी ठरली होती. परंतु कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्ष मंदिरे, यात्रा-उत्सवांवर निर्बंध असल्याने इच्छा असूनही रामभाऊ मारकड यांना नवस पुर्ण करता आला नाही.
परंतु यंदाच्या वर्षी त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना बोलावून त्यांच्या वजनाइतके तब्ब्ल ८९ किलोंची पेढेतुला करून अखेर नवस पूर्ण केला. कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आमदार भरणे व भारावून गेले होते. यावेळी आमदार भरणे यांच्याबरोबर रामभाऊ मारकड,पांडूरंग मारकड, बापू रेडके, विष्णू रेडके,संदिपान मारकड, परशुराम रेडके, विलास मारकड,भारत मारकड, महेंद्र रेडके, अरूण झिटे, दत्ता रेडके, अरूण मारकड, विशाल मारकड, हनुमंत रेडके, जितेंद्र मारकड, नवनाथ मारकड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
पडस्थळ येथील रामभाऊ मारकड यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या विजयासाठी केलेला नवस फेडण्यासाठी माझ्या वजनाइतकी पेढेतुला केली. माझ्या सारख्या सामान्य कुटूंबातील सुपुत्राला संपुर्ण तालुका प्रचंड प्रेम करतोय, हे खरंच माझे भाग्य आहे. अशी प्रतिक्रिया आमदार भरणे यांनी व्यक्त केली.