बारामती : महान्यूज लाईव्ह
जामखेड तालुक्यातील त्यांचं गाव तसं पाहायला गेलं तर कमी पर्जन्यछायेचा प्रदेश; पण महेंद्र बारसकरांचा नादच खुळा.. त्यांनी थेट रशियातून एक बियाणं आणलं.. कर्करोगाला रोगप्रतिकारक शक्ती असलेलं.. कॅल्शियमचं अधिक प्रमाण असलेलं हे धान्य बाजारात एक हजार रुपये किलो या दराने मिळतं.. बारस्करांनी पूर्वीची कसलीही माहिती नव्हती; पण हे बियाणे आणलं.. लावलं..ते उगवलं.. वाढलं.. त्याचं उत्पादन देखील सगळ्यात जास्त घेतलं आणि आता हेच बारस्कर जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन हेच धान्य १ हजार रुपये किलोने विकत आहेत.
आज बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन मध्ये बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट रस्त्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या धान्य महोत्सवात बारस्कर यांनी सहभाग घेतला आहे ते त्यांचे च्या हे धान्य घेऊन आले आहेत या महोत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण धान्य असलेल्या दालनामध्ये बारस्कर हेही एक शेतकरी सहभागी आहेत ते सध्या या धान्याची माहिती शेतकऱ्यांना पटवून देत आहेत.
चिया नावाचे धान्य अमेरिकेत जास्त करून खाल्लं जातं. हे श्रीमंताचं अन्न म्हटलं जातं..पण ते आरोग्यास परिपूर्ण देखील मानलं जातं. अगदी दोन ते तीन ग्राम या प्रमाणात हे भिजवलेले धान्य घेतल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स, कॅल्शियम व विटामिन्स मिळतात असं सांगितलं जातं. हे धान्य जामखेड सारख्या भागात उगवून, वाढवून ते बाजारात आणण्याचं काम महेंद्र बारस्कर या सामान्य शेतकऱ्यानं केलं आहे.
बारस्कर यांची पुतणी रशियात वैद्यकीय शिक्षण घेते. त्या ठिकाणी तिने हे सर्व पाहिले आणि आपल्या कुटुंबासाठी रशियातील दवई या भागातून तिने हे बियाणे खरेदी करून गावाकडे पाठवून दिले. बारस्कर यांना देखील फारशी माहिती नव्हती. पण त्यांनी युट्युब सर्च करून याची लागवड पद्धत पाहिली.
त्यांच्याकडेही पाण्याची कमतरता आहे. पण हे पीक कमी पाण्यात येते याची माहिती मिळाल्याने त्यांना हुरुप आला. त्यांनी हे बियाणे लावले. बियाण्याची काळजी घेतली. रोपांची काळजी घेतली आणि प्रती एकरी सात क्विंटल पर्यंत याचे उत्पादन मिळते अशी माहिती त्यांना मिळाली होती. मात्र शेतातील पोताचा दर्जा एवढा चांगला ठेवला की, याचे उत्पादन एकरी दहा क्विंटल मिळाले.
सध्या बारस्कर हे वेगवेगळ्या कृषी महोत्सवांमध्ये जाऊन या धान्याची महती ग्राहकांना पटवून देत आहेत आणि त्यातून हे धान्य विकत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी १ हजार रुपये प्रति किलो दराने पाच क्विंटल चिया नावाचे धान्य विकले आहे.
एवढ्या महाग दराने हे धान्य लोक कसे घेतील? असा प्रश्न विचारला, तर बारस्कर म्हणाले, दमाने विकेल पण एक हजार रुपयांच्या खाली विकणार नाही. याचे महत्त्व पटवून दिले की लोक घेतात हा माझा अनुभव आहे. आणि तुम्हाला तुमचे उत्पादन विकण्याचा अनुभव किंवा कौशल्य यायलाच पाहिजे.