इंदापूर – महान्यूज लाईव्ह
निरा डाव्या कालव्याच्या सणसर -रायतेमळा परिसरातील ३९-ब क्रमांकाच्या वितरिकेतून आज पुन्हा गळती झाल्याने अगोदरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, त्यात पुन्हा नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत असल्याने माजी मंत्री दत्तात्रेय भरणे आक्रमक झाले होते. त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
पंधरा दिवसांपूर्वीच हीच वितरिका खालून दगड निखळल्याने गळती झाली होती. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले आणि काही शेतकऱ्यांच्या शेतजमीनी खरवडून गेल्या. या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले, मात्र त्यांना नुकसान भरपाई कसलीच मिळालेली नाही, त्यात आता पुन्हा पाणी जाऊन या शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे.
आज भरणे यांनी लगेचच स्वतः भेट देत कालव्याची पाहणी केली. त्यांनी जलसंपदा विभागाच्या स्थानिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून खडे बोल सुनावले. स्थानिक नागरिकांनी भरणे यांना यासंदर्भात आम्ही अगोदरच जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना कळवले होते व गेली पाच ते सहा दिवस यातून पुन्हा गळती सुरू झाली होती हे सांगितले होते असे निदर्शनास आणून दिल्याने भरणे आक्रमक झाले होते.
भरणे यांनी अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त करीत नुकसानग्रस्त भागाचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर शासकीय मदत मिळाली पाहीजे अशी सूचना केली.