विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याच्या कार्यक्षमतेविषयी विरोधकांनी देखील कौतुक केले असतानाच आज नकळतपणे बारामतीतील सभेत देखील त्याचा प्रत्यय आला. अजित पवार हे सर्वाधिक वेळ विधिमंडळात उपस्थित असतात, त्याची माहिती एव्हाना राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहोचली आहेच, परंतु या सभागृहाचे कामकाज ऐकताना, पाहताना व तेथे बोलताना त्यामधील ज्या कोणत्या सवयी असतात, त्यांनी देखील नकळतपणे लागतात याचाच प्रत्यय आज बारामतीत देखील आला.
कार्यकर्त्यांच्या बोलावलेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी बोलता बोलता अचानक अध्यक्ष महोदय असा शब्द उच्चारला आणि उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला. त्यानंतर थोडा वेळ अजित पवार यांनी देखील पॉज घेतला आणि अजित पवार देखील हास्यात सहभागी झाले. सॉरी म्हणत हा सवयीचा परिणाम असे ते म्हणाले आणि त्यानंतर पुन्हा उपस्थित कार्यकर्ते व शेतकऱ्यांमध्ये हास्याची लकीर उमटली.
राज्यातील काही नेत्यांना ट्रोल करताना अध्यक्ष महोदय हा शब्द महाविकास आघाडीचे ट्रोलर किंवा समर्थक आवर्जून मांडत असतात, मात्र विधिमंडळात कामकाज करताना अथवा कामकाजात सहभाग घेताना लक्षवेधी किंवा इतर प्रश्नावर बोलताना प्रत्येक आमदार हे विधानसभेच्या अध्यक्षांचा आदरपूर्वक उल्लेख करत असतात. प्रत्येक माहिती देताना अध्यक्ष महोदय असे म्हणण्याची ही प्रथा आहे आणि त्याचीच लागलेली सवय आणि त्याचे आलेले प्रत्यंतर आज बारामतीत देखील शेकडो जणांना हसवून गेले.