बारामती : महान्यूज लाईव्ह
अजितदादांनी आज बारामतीच्या मेळाव्यात बोलताना आज जोरदार बॅटिंग केली. विरोधकांना त्यांनी टोले लगावलेच, परंतु स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांनाही सोडले नाही. त्यांच्याकडे मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीचा उल्लेख करत मी किंवा सुप्रिया बाहेर असल्यानंतर कोणीतरी स्वतःला अजितदादा किंवा सुप्रियाताई समजते अशा स्वरूपात त्यांनी टोला लगावला. त्याचबरोबर पनवेलला कोणते कोणते पदाधिकारी जातात? असाही खोचक सवाल त्यांनी केला आणि बारामतीत राष्ट्रवादीचेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.
बारामतीतील बाजार समिती, सहकारी दूध संघ व पुरंदर तालुक्यातील निरा बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज बारामतीतील राष्ट्रवादी भवनमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात अजित पवार यांनी दीर्घकाळ भाषण केले.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाषणापूर्वी त्यांच्याकडे आलेल्या विविध निवेदनांचा व तक्रारींचा उल्लेख करत वरील मुद्द्याला स्पर्श केला आणि उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली.
अजितदादांकडे काही कार्यकर्त्यांनी गोपनीय पत्र दिले होते. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचेच काही पदाधिकारी कशाप्रकारे चुकीचे वागतात याचा उल्लेख केला होता. त्याचा उल्लेख करत अजितदादांनी स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
अजितदादा यांनी या तक्रारीचा उल्लेख करत मी किंवा सुप्रिया बारामतीत असतो, तोपर्यंत काही नसते, परंतु जेव्हा बारामतीतून बाहेर जातो, तेव्हा काहींना आपणच दादा असल्यासारखे वाटते. हे पदाधिकारी कोण? यामध्ये जे जे कोणी असतील त्यांनी याचा विचार करावा. कोणी नसतील तर या कानाच्या ऐकून त्या कानाने सोडून द्या. आपले त्याबद्दल काही म्हणणे नाही, परंतु जर खरोखरच असे काही असेल तर त्यांनी यावर विचार करावा असा गर्भित इशारा देखील अजितदादांनी दिला.
याच भाषणादरम्यान काही पदाधिकारी पदे घेतात मात्र पक्षासाठी वेळ देत नाहीत, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच अजितदादांनी आणखी एका तक्रारीचा आपल्या भाषणात उल्लेख केला. कोण कोणते पदाधिकारी पनवेलला जातात? असा उल्लेख करून प्रश्न करताच उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला.