सचिन पवार, सुपे
आपल्या बॅंक खात्यावर अचानक आलेले ४९ हजार आपल्याला विस्मयाकित अथवा आनंदित करू शकतात.. बारामती तालुक्यातील सुपे येथील पत्रकार व चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमध्ये सरपंचांचे पात्र साकारणाऱ्या सुदाम नेवसे यांनाही काही क्षणच आनंद वाटला.. मात्र ते पैसे आपले नाहीत हे ज्या क्षणी त्यांना कळले त्याक्षणी त्यांनी केलेली कृती सध्या कौतुकाचा विषय बनला आहे.
सुपे येथील शेतकरी, पत्रकार व कलाकार अशा तिहेरी भूमिकेत सामान्यांमध्ये परिचित असणाऱ्या सुदाम नेवसे यांचा ऊस गाळपासाठी यावर्षी पाटस येथील निराणी ग्रुपच्या भिमा कारखान्यात गाळपासाठी गेला होता.
त्यांच्याप्रमाणेच परिसरातील इतरही शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यास गाळपासाठी गेला. या उसाचे पैसे नेवसे यांना मिळणे अपेक्षितच होते. मात्र सुपे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील नेवसे यांच्या खात्यावर ४९ हजार ३०३ इतकी रक्कम अचानक आली.
ही रक्कम दंडवाडी (ता . बारामती) येथील विजय राजाराम चांदगुडे यांची आल्याचे कारखान्याचे कर्मचारी उद्धव वाबळे यांनी नेवसे यांना मोबाईलवरून फोन करून लक्षात आणून दिले व ते बिल त्यांच्या मोबाईलवर पाठवून दिले.
नेवसे यांनी सुपे येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जाऊन खातरजमा करून घेतली. तातडीने बँकेच्या त्यांच्या खात्यावरून ही रक्कम काढून घेऊन सदर विजय चांदगुडे या शेतकऱ्याला बँकेत बोलावून बँकेचे शाखाधिकारी धनंजय गायकवाड यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आली. यावेळी लेखनिक संदीप मुळीक, रोखपाल श्रीनिवास हिरवे, कर्मचारी समीर शेख, ऋषी नाणेकर आदी उपस्थित होते.