जालना – महान्यूज लाईव्ह
रावसाहेब दानवे हे भाजपचे खासदार आणि केंद्रात मंत्री आहेत. मात्र त्यांनी आज जे वक्तव्य केले, त्यामुळे त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय की, केंद्राकडून निधी मिळत नाही याचे स्पष्टीकरण दिलेय हे समजायला मार्ग नाही. मात्र त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र नक्कीच गेल्या आहेत.
जालना शहरातील बडी सडक येथील विविध विकासकामांच्या उदघाटनाच्या निमित्ताने दानवे बोलत होते. त्यांचे हे मिश्किल विधान त्यांच्या अडचणी वाढविण्याची शक्यता आहे.
दानवे म्हणाले, आमदारांना एका विधानसभा मतदारसंघासाठी ५ कोटी आणि खासदारांना सहा तालुके किंवा पाच तालुके यांसाठी ५ कोटीच निधी मिळतो. त्यामुळे जर अगदी मतदारसंघात बिड्या वाटायचं जरी ठरवलं, तरी तो निधी पुरणार नाही.
अर्थात आपण केंद्रात मंत्री असल्याने या निधीवर अवलंबून राहत नाही. मी राज्य सरकारकडूनही निधी आणतो. शहरातील एका रस्त्याच्या कामाला ७ कोटी दिले, म्हणजे माझा निधी संपला असे समजण्याचे काहीच कारण नाही.
हे बोलतानाच दानवे यांनी माझ्याकडे अल्लाऊद्दीनचा जादूचा दिवा आहे असा एक उल्लेख केला. आता त्यांनी अल्लाऊद्दीन कोणाला म्हटले याचीच चर्चा सुरू झाली आहे.