कर्जत : महान्यूज लाईव्ह
गुढीपाडव्याचे मुहूर्त साधून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जामखेड मधील हजारो हात गावाच्या स्वच्छता व श्रमदानासाठी पुढे सरसावणार आहेत. ( Under the guidance of Rohit Pawar, MLA of Karjat Jamkhed and Sunanda Pawar, Trustee of Agricultural Development Trust, Baramati, thousands of hands from Karjat Jamkhed will move forward for the cleanliness and labor of the village.)
कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षापासून ग्रामस्थांना एकत्र करून त्यांना विश्वासात घेऊन समृद्ध गाव ही संकल्पना कर्जत व जामखेड तालुक्यात सुरू आहे. या संकल्पने अंतर्गत प्रत्येक कुटुंब आणि कुटुंबांच्या माध्यमातून प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींच्या जोडीला आता गावकरी देखील या आपल्या गाव विकसित करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. समृद्ध गाव संकल्पनेचा दुसरा टप्पा कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असून या दोन तालुक्यातील 28 गावांमध्ये 2 एप्रिल रोजी गाव शिवारात श्रमदानाची गुढी उभारली जाणार आहे. या मोहिमेच्या सुरुवातीला गावातून हजारो जण श्रमदान करणार आहेत. दोन एप्रिल रोजी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
श्रमदानाच्या माध्यमातून गाव स्वच्छता, समतल चर, ओढा खोलीकरण, ओढा सरळीकरण, तलावातील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलावांची दुरुस्ती, कंटूर बांध आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी नाम फाउंडेशन, मानवलोक संस्था आंबेजोगाई, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे.
यावर्षी दोन एप्रिल रोजी जामखेड मधील डोणगाव, पाडळी, मोहा, कोल्हेवाडी, नाहुली, देवदैठण, राजुरी, पिंपळगाव आळवा, वाकी, लोणी, जातेगाव, दिघोळ, मुंगेवाडी व जायभाय वाडी या गावांनी श्रमदान गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे, तर कर्जत तालुक्यातील दगडी बारडगाव, भांबोरा, आखोणी, बेनवडी, कोळवडी, डोंबाळवाडी, कोपर्डी, वाडगाव तनपुरा, कोपर्डी, चांदे बुद्रुक, खांडवी, घुमरी, टाकळी खंडेश्वरी व भोसे या गावांनी हा समृद्धीचा संकल्प केला आहे.
दोन एप्रिल रोजी या मोहिमेच्या सुरुवातीसाठी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते हे देखील उपस्थित राहणार आहेत, तर या मोहिमेच्या अंतर्गत या 28 गावांमध्ये गुढीपाडव्यापासून दररोज दोन तास ग्रामस्थ श्रमदान करणार आहेत. दोन एप्रिल रोजी या 28 गावातील दहा हजार ग्रामस्थ श्रमदानाची गुढी उभारून एक इतिहास निर्माण करणार आहेत. या श्रमदान चळवळीत परिसरातील इतर गावे व ग्रामस्थांनी आपला विना निमंत्रण सहभाग नोंदवून या सहकार्याला हातभार लावून पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण करावा असे आवाहन सौ. सुनंदा पवार यांनी केले आहे.