बारामती : महान्यूज लाईव्ह
ती बारामती तालुक्यातील छोट्याशा गावातून आलेली.. अकरा वर्षांपूर्वी लग्न झाले.. संसारवेलीवर दोन मुले झाली आणि त्यानंतर उद्भवलेल्या आर्थिक अडचणींचा सामना करताना तिच्यातील आईला भविष्याची साद आणि चिंता दोन्ही दिसू लागले.. काय करावे? हा प्रश्न पुढे पडला आणि तिने पुन्हा नव्याने आयुष्य घडवण्यासाठी कंबर कसली! त्यासाठी तिने महिलांच्या सक्षमीकरणात गेली अनेक वर्ष अमूल्य योगदान दिलेल्या सौ सुनंदा पवार यांची भेट घेतली आणि सुरू झाला तिचा अज्ञातातून नवं आयुष्य घडवणारा प्रवास..!
बारामतीच्या ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत 613 जणी राज्यातील पोलिस दलात सहभागी झालेल्या आहेत. त्या सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस दलात कार्यरत आहेत. यावर्षी नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेत शारदानगरच्या शारदा स्पोर्ट अकॅडमी मधून तब्बल 25 युवती महिला पोलीस दलात यशस्वीरीत्या भरती झालेल्या आहेत.
महाराष्ट्रात महिलांना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी राज्यातील ही एकमेव संस्था आहे. या संस्थेने आजवर केलेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील शेकडो युवती त्यांचे आयुष्य समृद्ध करू शकल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नव्याने भरती झालेल्या 25 युवतींचा सत्कार ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करत असलेल्या बचत गटातील महिला, सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या. या पंचवीस जणींच्या कार्यकर्तृत्वाने या महिलांना देखील प्रभावित केले. त्यातीलच एक होती हीना इनामदार!
यावेळी उपस्थित महिलांना पुढे हिना इनामदार या अकरा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलेने आपल्या पोलीस बनण्याच्या प्रवासाची यशोगाथा विशद केली. विवाह झाल्यानंतर तब्बल अकरा वर्ष शिक्षणापासून दूर असूनही हिना हिने गाठलेले तिचे ध्येय सर्वांनाच अचंबित करणारे ठरले.
बारामती तालुक्यातील मुरूम येथील ही महिला नुकतीच पोलीस भरती झाली असून, तिने सांगितले की, सुनंदा वहिनींच्यामुळे मी माझं आयुष्य नव्याने सुरुवात करू शकले. विवाह झाल्यानंतर दोन मुले झाली आणि त्यानंतर संसारातच गुरफटून जाण्याची वेळ आली. परंतु काही कारणांमुळे मी पुन्हा आर्थिक अडचण दूर करण्यासाठी करिअर घडवण्याचा मानस केला आणि माझ्या स्वप्नांना आभाळाएवढे पंख ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ सुनंदा पवार यांनी दिले.
अनेकदा आत्मविश्वासाला कात्री लागायची. परंतु सुनंदा वहिनी वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करायच्या. कोरोना चा काळ आला, तरीही ऑनलाइनच्या माध्यमातून आमचे प्रशिक्षण थांबले नाही. मोफत प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेमुळे माझ्यासह शेकडो जणांचे संसार फुलले आहेत. याचा मला आणि माझ्या सर्व सहकारी भगिनींना अतिशय आनंद आहे. ही परंपरा अशीच टिकावी आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलींचे आयुष्य समृद्धीने फुलावे हिच सुनंदा वहिनींकडे प्रार्थना..! तिच्या या वाक्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
नुकत्याच झालेल्या 2019 च्या महाराष्ट्र शासन पोलीस भरतीत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून 25 युवतींची पोलीस शिपाई या पदावर नियुक्ती झाली आहे या सावित्रीच्या लेकींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा भरती परीक्षेत उमटविलाच, शिवाय शारदा महिला मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कामगिरीही वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.
शारदानगर च्या या नव्याने भरती झालेल्या 25 रणरागिणींचा कौतुक व सन्मान संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते झाला. आतापर्यंत गेल्या 14 वर्षात या भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण केंद्रातून 588 मुली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलिस मुख्यालयात व पोलीस ठाण्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळ आपली जबाबदारी व कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.
नव्याने 25 युवतींची पोलीस दलात निवड झाल्यामुळे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेच्या मोफत प्रशिक्षण केंद्रातुन पोलीस भरती झालेल्या युवतींची संख्या 613 वर पोहोचली आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूरांच्या मुलींकरता व आर्थिक परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या पुढचे उच्च शिक्षण घेता न येणाऱ्या युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे व त्यांच्या अंगावर खाकी वर्दी यावी यासाठी स्वतःहून केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे
या प्रशिक्षण केंद्रातील युवतींना ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्रदादा पवार, विश्वस्त सुनंदाताई पवार, सीईओ निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे यांनी वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन व प्रेरणा दिली. नितिन खारतोडे, आर.आर.कदम, संतोष लोणकर, शरद ताटे, सोनाली काटकर, चंद्रकांत जराड, वर्षा देवकाते इत्यादी शिक्षकांनी ट्रेनिंगचे लेखी व मैदानी प्रशिक्षणाचे कामकाज पाहिले.