दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या मळद तलावात कुरकुंभ हद्दीत मागील एक महिन्यापासून खुलेआम बेकायदा वाळू उत्खनन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या रस्त्यावरून जेसीबी मशीन, वाळू वाहतूक करणारी वाहने यांची वर्दळ होत आहे. परिणामी तलाव परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेकायदा वाळू उत्खनन करणार्यांवर त्वरीत कारवाई करावी.अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहे.
दौंड तालुक्यातील मळद येथील तलावातील पाणीसाठा आटु लागला आहे. कुरकुंभ हद्दीत असणाऱ्या आसपासच्या डोंगरदऱ्यातुन पावसाचे पाणी तलावात येत असते. या प्रवाहात असलेल्या ओढ्यात व तलावात कुरकुंभ येथे काही स्थानिक वाळू माफियांनी जेसीबी यंत्राच्या साह्याने बेकायदा वाळू उत्खनन करण्याचा सपाटा मागील एक महिन्यापासून लावला आहे. वाळू उत्खनन करून तलावाच्या वरती पुणे-सोलापुर महामार्गालगत वाळूचा साठा केला जातो. मागील कित्येक दिवसांपासून हा प्रकार चालू आहे. महसूल विभाग व पोलिस प्रशासनाने हा बेकायदा वाळू उपसा बंद करून संबधित स्थानिक वाळू माफियांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच या वाळू माफियांची जेसीबी मशीन, ट्रॅक्टर जप्त करून गुन्हे दाखल करून कारवाई केली होती. मात्र एक महिन्यापासून पुन्हा संबंधित वाळू माफियांनी मळद तलावात वाळू उत्खननाचा सपाटा चालू केला आहे.
याबाबत पाटस मंडलाधिकारी सुनील गायकवाड म्हणाले की, मळद तलावात वाळू उपसा चालू आहे का नाही ? याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल. तशा सूचनाही तलाठी यांना देण्यात येईल.