सणसर : इंदापूर तालुक्यात 61 गावांची निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून सध्या आरक्षणाच्या सोडती सुरू आहेत. आपल्या प्रभागात नेमके कशाचे आरक्षण आहे, याची उत्सुकता असलेले आणि उमेदवारीची तयारी करणारे असे दोन्ही गट सध्या गावागावात चहाचा कट्टा गाठू लागले आहेत. त्यामुळे ऐन थंडीत चहाचे स्टॉल गजबजले आहेत.
इंदापूर तालुक्यात जणू मिनी विधानसभाच येत्या दोन महिन्यापासून दिसणार आहे. जून ते डिसेंबर २०२० दरम्यान गावची पंचवार्षिक कारभाऱ्यांची मुदत संपत असल्याने नवे कारभारी निवडण्याची मोहिम याच कालावधीत होणार आहे, त्यासाठी सध्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सध्या आरक्षणाच्या सोडतींची प्रक्रिया सुरू आहे. या आरक्षणानुसार प्रभागात जाहीर होणाऱ्या आरक्षित जागांकडे इच्छुकांचे लक्ष आहे,. आपल्या मनपसंतीचे आरक्षण जाहीर झाल्यास लागलीच तयारी करणाऱ्यांचीही भाऊगर्दी सध्या गावागावात वाढू लागली असून कधीच लोकांत न फिरकणारेही तालुक्यात गावातील प्रमुख चौकांमध्ये दिसू लागले आहेत.
नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली असून या निवडणूकीत राष्ट्रवादी व भाजप यांच्यातील एकूण मतांची सरासरी जवळपास एकसारखी आहे, त्यामुळे विधानसभेला दिसलेली चुरस गावागावातही दिसेल, किंबहूना ती गावांमध्ये अधिक जाणवेल अशी चिन्हे आहेत. एकंदरीतच सध्या गावकारभारी निवडण्यासाठी प्रशासकीय हालचाली सध्या गतीमान झाल्या आहेत.
सणसर गावातील पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग 1- भवानीनगर-भाग्यनगर – खुला गट (सर्वसाधारण), इतर मागास प्रवर्ग महिला व इतर मागास प्रवर्ग (सर्वसाधारण).
प्रभाग 2- अशोकनगर – अनूसूचित जाती महिला प्रवर्ग, अनुसूचित जाती (सर्वसाधारण).
प्रभाग 3- इरिगेशन बंगला – साईनगर : खुला गट सर्वसाधारण, खुला गट महिला प्रवर्ग व इतर मागासप्रवर्ग महिला प्रवर्ग.
प्रभाग 4- सणसर गावठाण : खुला गट सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग महिला.
प्रभाग 5- रायतेमळा -शंभोनगर : खुला प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती- सर्वसाधारण, अनुसूचित जाती महिला प्रवर्ग.
प्रभाग 6- हिंगणेवाडी-भोईटे वस्ती : इतर मागास सर्वसाधारण, खुला प्रवर्ग महिला राखीव व खुला प्रवर्ग सर्वसाधारण










