मुंबई – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणावरून राज्य व केंद्र सरकारमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातूनच एकीकडे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार एनआयए कडे तपास सोपवला नाही, तर राज्य सरकारला केंद्र सरकार बरखास्त करेल असा इशारा दिला आहे, तर त्यांच्या इशाऱ्यानंतर काही वेळातच राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हिंमत असेल तर बरखास्त करूनच दाखवा असे आव्हान दिले आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या तपासावरून सध्या राजकीय संबंध ताणले गेले आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचार तपासाबाबत राज्य शासनाने एनआयएला सहकार्य केले नाही, तर राज्य सरकार बरखास्त होऊ शकतं असा इशारा मुनगंटीवार यांनी आज दिला होता. एनआयएच्या पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने या तपासाबाबत काल पुण्यात पोलिस आयुक्तांकडून माहिती घेतल्यानंतर त्यासंदर्भातील कागदपत्रे पोलिसांनी त्यांना दिली नाहीत, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यासंदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांना आज छेडले असता त्यांनी वरील इशारा दिला. मात्र मुनगंटीवार यांच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते व सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देत केंद्र सरकारलाच आव्हान दिले. पंतप्रधान मोदी आणि शहांच्या विरोधात हे सरकार सत्तेवर आले आहे, सामान्य जनता मोदी शहांच्या कुटील कारस्थानांना बळी पडणार नाही. कोरेगाव भीमा प्रकरणाची राज्य सरकारकडून चौकशी सुरू आहे, अशा स्थितीत जर बरखास्तीची भाषा कोणी वापरत असेल तर त्यांनी खरोखरच राज्य सरकार बरखास्त करून दाखवावे असे मलिक यांनी म्हटले आहे. आता मलिक यांच्या या प्रत्युत्तराचा सामना भाजप कसा करतो हे पाहावे लागेल.











good initiative…!